बनवडी (तालुका कराड) येथील दर्ग्‍यावरील भोंगा केवळ मुसलमानांच्‍या सणालाच वाजणार !

ग्रामसभेत एकमुखी ठराव संमत

प्रतीकात्मक छायाचित्र

कराड, ९ जून (वार्ता.) – तालुक्‍यातील बनवडी येथे असलेल्‍या दर्ग्‍यातील भोंगा मुसलमान समाजाच्‍या राष्‍ट्रीय सणाच्‍या दिवशीच चालू ठेवण्‍याचा ऐतिहासिक निर्णय ७ जून या दिवशी झालेल्‍या ग्रामसभेत एकमुखाने घेण्‍यात आला. ग्रामसभेच्‍या अध्‍यक्षस्‍थानी गावचे सरपंच प्रदीप पाटील होते. या वेळी गावातील हजरत खैरत पीर ट्रस्‍टला लागून असलेली दफनभूमी बंद करण्‍याचा निर्णयही घेण्‍यात आला.

यापुढे वक्‍फ बोर्डाच्‍या मालकीच्‍या २ गुंठे जागेतच दफनभूमी करण्‍यात येईल. केवळ न्‍यासाच्‍या कुटुंबियांचेच दफन या दफनभूमीत करण्‍यात येईल. दफनभूमीच्‍या जागेला ग्रामपंचायत आणि न्‍यास यांच्‍या संयुक्‍त संमतीने न्‍यासच्‍या वतीने संरक्षक भिंत बांधण्‍यात येईल. त्‍यामुळे विश्‍वस्‍त आणि त्‍यांचे कुटुंबीय वगळता इतर कुणाचाही या दफनभूमीशी संबंध रहाणार नाही. यापुढे गावठाणातील कोणत्‍याही मोकळ्‍या जागेत कोणत्‍याही धार्मिक स्‍थळासाठी अनुमती न देण्‍याचा निर्णय सर्वानुमते घेण्‍यात आला आहे. ग्रामसभेस बहुसंख्‍य युवक आणि ग्रामस्‍थ उपस्‍थित होते.