गोवा : कारागृह महानिरीक्षक ओमवीर सिंह यांची कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाला आकस्मिक भेट

बंदीवानांकडे ३० भ्रमणभाष संच, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि तंबाखूजन्य पदार्थ सापडले !

पणजी, २ जून (वार्ता.) – कारागृह महानिरीक्षक ओमवीर सिंह यांनी १ जूनच्या रात्री उशिरा कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाला आकस्मिक भेट दिली. या वेळी त्यांना बंदीवानांकडे ३० भ्रमणभाष संच, ब्ल्यूटूथसह अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू सापडल्या. ३ दिवसांपूर्वी कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध झाले होते, तसेच अनेक वेळा नियमबाह्य कृतींमुळे कोलवाळ मध्यवर्ती कारागृह एक चर्चेचा विषय ठरला आहे. या पार्श्‍वभूमीवर कारागृह महानिरीक्षक ओमवीर सिंह यांनी ही भेट दिली. विशेष म्हणजे सध्या कारागृहाचे दायित्व पोलिसांकडे सोपवण्यात आले असले, तरी कारागृहातील सावळा गोंधळ चालूच आहे. कारागृहात अनेक छुपे प्रकार चालू आहेत.

कारागृह महानिरीक्षक ओमवीर सिंह

कारागृहात भ्रमणभाष संच आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास बंदी असतांनाही बंदीवानांपर्यंत या वस्तू कशा पोचतात ?, यापूर्वीच्या कारवाईत कह्यात घेतलेल्या वस्तू पुन्हा बंदीवानांना कशा मिळाल्या ?, त्यांची नियमित पहाणी होत नाही का ?, यांविषयी स्पष्टीकरण देण्याचे निर्देश कारागृह अधिकार्‍याला (जेलरला) देण्यात आल्याची माहिती कारागृह महानिरीक्षक कार्यालयातून देण्यात आली. विशेष म्हणजे कारागृह महानिरीक्षकांनी यापूर्वी २ वेळा टाकलेल्या धाडींच्या वेळी  बंदीवानांकडून भ्रमणभाष संच कह्यात घेण्यात आले होते. (याचा अर्थ बंदीवानांना पोलिसांचा आणि कारागृह रक्षकांना वरिष्ठांचा धाकच राहिलेला नाही, असेच म्हणावे लागेल. त्यामुळे अशांवर कठोर कारवाई होणेच अपेक्षित आहे. – संपादक)

कारागृह महानिरीक्षकांच्या भेटीच्या वेळची कारागृहातील स्थिती

कारागृह महानिरीक्षक ओमवीर सिंह यांचा गट १ जूनच्या रात्री उशिरा कारागृहात आला, तेव्हा बंदीवान त्यांच्याच मस्तीत दंग असल्याचे दिसले. कुणी भ्रमणभाषवर बोलण्यात दंग होते, तर कुणी इंटरनेटवर सर्फिंग करत होते. काही जण यूट्यूबवर चलचित्र पहात होते. पोलिसांना पाहिल्यानंतर बंदीवानांनी त्यांचे भ्रमणभाष संच लपवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी झडती घेतली असता त्यांना अनेक भ्रमणभाष संच दृष्टीस पडले; परंतु त्यांना सर्वच भ्रमणभाष संच सापडले नाहीत; कारण अनेक बंदीवान भ्रमणभाष संच लपवण्यात पुष्कळ सराईत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

(सौजन्य : Prudent Media Goa) 

बंदीवानांकडे तंबाखूजन्य पदार्थही सापडले

महानिरीक्षकांच्या पहाणीच्या वेळी बंदीवानांकडे तंबाखूजन्य पदार्थही सापडले. या वेळी काही बंदीवान सिगारेट ओढत असल्याचे आढळले. यापूर्वी कैद्यांकडे गांजाही सापडला होता.

संपादकीय भूमिका

यात कारागृह रक्षक किंवा अधिकारी यांच्या सहभाग होता कि त्यांना चकवून या वस्तू बंदीवानांपर्यंत पोचल्या, याचे अन्वेषण करावे आणि वरीलपैकी कोणतेही कारण असले, तरी त्यानुसार कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !