मशिदींवरील ध्वनीक्षेपकांद्वारे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारींवर कारवाई न होणे, हा न्यायालयाचा अवमान !

मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले !

तक्रारींकडे कानाडोळा करणार्‍या पोलिसांच्या कारभाराविषयी खेद व्यक्त !

मशिदींवरील ध्वनीक्षेपकांवर पोलिसांकडून कारवाई न होणे, हा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान

मुंबई – मशिदींवरील ध्वनीक्षेपकांद्वारे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारींवर पोलिसांकडून कारवाई न होणे, हा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने २६ मे या दिवशी पोलिसांना फटकारले. या तक्रारींकडे कानाडोळा करणार्‍या पोलिसांच्या कारभाराविषयीही न्यायालयाने खेद व्यक्त केला. न्यायमूर्ती अभय अहुजा आणि न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये यांच्या सुट्टीकालीन खंडपिठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली.

कांदिवली (पूर्व) येथील ठाकूरगाव परिसरातील मशिदींवरील ध्वनीक्षेपकांमुळे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाविषयी वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या पोलिसांविरुद्ध अधिवक्ता रीना रिचर्ड यांनी केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने गेल्या मासात नोंद घेतली होती. रात्रीच्या वेळी ध्वनीक्षेपकांचा वापर केला जाणार नाही, हे पहाण्याचा आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिला होता. ‘याविषयीच्या कायद्याचे पालन न केल्यास अवमानाची कारवाई करू’, अशी चेतावणी न्यायालयाने पोलिसांना दिली होती.

याचिकाकर्तीने केलेल्या तक्रारींवर कारवाई करण्याविषयीही न्यायालयाने बजावले होते. या आदेशांनंतर दोन वेळा तक्रार करूनही पोलिसांकडून कारवाई केली गेली नाही. त्यामुळे याचिकाकर्तीने पुन्हा एकदा सुट्टीकालीन न्यायालयात धाव घेऊन पोलिसांची निष्क्रियता न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.