स्‍वातंत्र्यवीर सावरकर : छत्रपती शिवरायांचा निष्‍ठावंत आणि आदर्श मावळा

सावरकर जयंतीचे औचित्‍य साधून महाराष्‍ट्र सरकारने २१ ते २८ मे या कालावधीत आयोजित केलेल्‍या ‘विचार जागरण सप्‍ताहा’च्‍या निमित्ताने…

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांना शिवचरित्राने क्रांतीकार्याला प्रेरणा दिली. सावरकर स्‍वतःविषयी सांगतांना म्‍हणतात, ‘‘मी सावरकर कुटुंबात जन्‍माला आलो असलो, तरी श्रीराम, श्रीकृष्‍ण, आर्य चाणक्‍य, चंद्रगुप्‍त मौर्य, विक्रमादित्‍य, शालिवाहन, छत्रपती शिवराय, महाराणा प्रताप, गुरुगोविंद सिंह या आणि अशा वीर पुरुषांच्‍या वंशातील आहे.’’ स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे हे उद़्‍गार आपल्‍या सर्वांना आपली राष्‍ट्रीय ओळख करून देण्‍यास पुरेसे आहेत. आपल्‍या राष्‍ट्राची ऐतिहासिक, सांस्‍कृतिक आणि धार्मिक परंपरा हीच आपली खरी ओळख आहे. सावरकर यांचा हाच विचार पाठ्यपुस्‍तकातील प्रतिज्ञेमध्‍ये ‘माझ्‍या देशाच्‍या विविधतेने नटलेल्‍या परंपरेचा पाईक होण्‍याची पात्रता माझ्‍या अंगी यावी; म्‍हणून मी प्रयत्न करीन’, या एका वाक्‍याने अधोरेखित केला गेला आहे.

१. छत्रपती शिवरायांची युद्धनीती आणि त्‍यांचे ध्‍येय, हेच सावरकर यांच्‍या सशस्‍त्र क्रांतीसाठीचे दीपस्‍तंभ !

छत्रपती शिवरायांचे श्रेष्‍ठत्‍व नेमकेपणाने व्‍यक्‍त करतांना सावरकर ‘हिंदुपदपादशाही’ या ग्रंथात लिहितात…

‘‘हिंदूंच्‍या राजकीय भाग्‍याला जी महत्त्वाची आणि विजयप्रवर्तक कलाटणी मिळाली, तिचे श्रेय शिवाजी महाराज आणि त्‍यांचे आध्‍यात्मिक गुरु समर्थ रामदासस्‍वामी यांनी आपल्‍या हिंदु जातीपुढे जे थोर आध्‍यात्मिक अन् राष्‍ट्रीय ध्‍येय ठेवले, त्‍या ध्‍येयाला जितके आहे, तितकेच त्‍यांनी समरक्षेत्रात उपयोगात आणलेल्‍या नवीन डावपेचाच्‍या युद्धपद्धतीला आणि शस्‍त्र साधनांना आहे. ‘महाराष्‍ट्र धर्म’ ही हिंदु जातीच्‍या राष्‍ट्रीय जीवनाची मृतप्राय झालेली ज्‍योत प्रज्‍वलित करणारी एक नवीन शक्‍ती होती, हे जितके सत्‍य आहे, तितकेच महाराष्‍ट्र युद्धपद्धत त्‍या काळी हिंदू लोकात प्रचलित असलेल्‍या युद्ध शास्‍त्रात क्रांती घडवणारी नवीन युद्धपद्धत होती, हे खरे आहे.’’

याच ग्रंथात सावरकर पुढे लिहितात, ‘‘ज्‍या युद्धपद्धतीने मुसलमानी सत्तेला मराठ्यांपुढे तग धरणे अशक्‍य केले आणि अंतिम हिंदुशीर्षावर विजयकिरीट चढवला, ती युद्धपद्धत म्‍हणजे शत्रूला चुकवावयाची गनिमी काव्‍याची युद्धपद्धत होती.’’

(संदर्भ : ‘समग्र सावरकर’ खंड तिसरा आणि ‘हिंदुपदपादशाही’, पृष्‍ठ २ आणि ३)

छत्रपती शिवरायांची युद्धनीती आणि त्‍यांचे ध्‍येय, हेच सावरकर यांना सशस्‍त्र क्रांतीच्‍या मार्गावरून वाटचाल करतांना मार्गदर्शन करणार्‍या दीपस्‍तंभासारखे वाटले. छत्रपती शिवरायांच्‍या काळात मुसलमानांची सत्ता हिंदूंना त्राही भगवान करून सोडत होती. या सत्ता नष्‍ट करून ‘हिंदवी स्‍वराज्‍याची स्‍थापना’ करण्‍यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायरेश्‍वराच्‍या मंदिरात आपल्‍या सवंगड्यांसह शपथ घेतली.

श्री. दुर्गेश परुळकर

२. स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती शिवरायांप्रमाणे स्‍वराज्‍यासाठी घेतलेली शपथ

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या काळात ब्रिटीश सरकारने अनन्‍वित अत्‍याचार केले. देशाची आर्थिक लूट केली. आपली परमप्रिय भारतमाता पुन्‍हा परकीय सत्तेच्‍या टाचेखाली घुसमटतांना सावरकर यांनी पाहिली. ‘छत्रपती शिवरायांप्रमाणेच आपणही आपल्‍या भारतमातेच्‍या मुक्‍ततेसाठी सशस्‍त्र लढा दिला पाहिजे. ते आपले राष्‍ट्रीय कर्तव्‍य आहे’, याची जाणीव सावरकर यांना बालवयातच झाली. छत्रपती शिवरायांनी इस्‍लामी सत्ता नष्‍ट करण्‍यासाठी शिवशंकराला साक्षी ठेवून शपथ घेतली होती. त्‍या वेळी छत्रपती शिवराय केवळ १५ वर्षांचे होते. सावरकर यांनीही घरातल्‍या अष्‍टभुजादेवीच्‍या समोर देशाच्‍या स्‍वातंत्र्यासाठी शपथ घेतली. त्‍या वेळी सावरकर यांचे वय १५ वर्षांचे होते. ही गोष्‍ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ही शपथ घेतांना सावरकर म्‍हणाले, ‘‘देशाच्‍या स्‍वातंत्र्यासाठी सशस्‍त्र क्रांतीचा सेतू उभारून मारता मारता मरेपर्यंत झुंजेन. यशस्‍वी झालो, तर छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे भारतमातेच्‍या मस्‍तकावर स्‍वातंत्र्याचा दैदीप्‍यमान मुकुट चढवेन ! अपयशी ठरलो, तर चापेकर बंधूंप्रमाणे हसत हसत फासावर जाईन.’’

३. अनेक राष्‍ट्रभक्‍तांना शिवचरित्राने मिळालेली प्रेरणा

‘शिवचरित्राने केवळ स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांना प्रेरणा दिली’, असे म्‍हणता येणार नाही. सावरकर यांच्‍याही आधी अनेक राष्‍ट्रभक्‍तांना शिवचरित्राने प्रेरणा दिलेली आहे. गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांनी छत्रपती शिवरायांचे चरित्र बंगालमधील बांधवांना राष्‍ट्रकार्यासाठी प्रेरित करण्‍यास उपयुक्‍त ठरेल; म्‍हणून बंगाली भाषेत उपलब्‍ध करून दिले. योगी अरविंद यांना छत्रपती शिवरायांमध्‍ये जगदंबेचे तेज आढळले. वासुदेव बळवंत फडके यांनी छत्रपती शिवरायांप्रमाणेच आपल्‍या समाजातील बांधवांना आपल्‍या समवेत घेऊन सशस्‍त्र क्रांती दल निर्माण केले. ‘पारतंत्र्यातील अंध:कारात स्‍वातंत्र्याचा वेध घेण्‍यासाठी संपूर्ण राष्‍ट्राला प्रेरणा देणारे छत्रपती शिवराय हे एकमेव राष्‍ट्रपुरुष आहेत’, याची जाणीव लोकमान्‍य टिळक यांना झाली; म्‍हणून त्‍यांनी ‘शिवजयंती’ उत्‍सवाचा घाट घातला.

लोकमान्‍य टिळक यांच्‍या या प्रयत्नाला सक्रीय दाद देतांना दामोदरपंत चापेकर म्‍हणाले,

‘‘नाही होत स्‍वतंत्रता शिव कथा, घोटून भाटापरी ।
घ्‍यावे लागता तसे शिवाजी बाजी परी हे, मस्‍त स्‍वहस्‍तावरी ।
हे जाणूनी तुम्‍ही आता स्‍वजन हो, घ्‍या खङ्‍ग ढाल हाती ।
मरा थाप भुजावरी अरी शिरे, तोडू असंख्‍यात ती ॥’’

असे म्‍हणून चापेकर बंधूंनी भारतमातेच्‍या मुक्‍ततेसाठी स्‍वतःचे बलीदान दिले.

४. छत्रपती शिवरायांनी मावळे आणि सावरकर यांच्‍यामध्‍ये निर्माण केलेली प्रेरणा

या सर्वांप्रमाणेच सावरकर यांच्‍यावरही शिवचरित्राची छाप पडली. छत्रपती शिवरायांनीच सावरकर यांना प्रेरणा दिली. छत्रपती शिवरायांनी ‘मी या देशाचा आणि हा देश माझा आहे’, ही भावना आपल्‍या बांधवांच्‍या मनात निर्माण केली. राष्‍ट्रकार्याच्‍या आड येणारी प्रत्‍येक गोष्‍ट सहजतेने बाजूला सारण्‍याची प्रेरणा छत्रपती शिवरायांनीच त्‍यांच्‍या मावळ्‍यांना दिली; म्‍हणूनच तानाजी छत्रपती शिवरायांना सहजतेने म्‍हणाला, ‘‘आधी लगीन कोंढाण्‍याचे मग माझ्‍या रायबाचे.’’ ‘मुलाच्‍या लग्‍नापेक्षा राष्‍ट्राची मुक्‍तता आणि हिंदवी स्‍वराज्‍याची स्‍थापना यांसाठी कोंढाणा जिंकणे अधिक श्रेष्‍ठ आणि महत्त्वाचे कार्य आहे’, याची जाणीव प्रत्‍येक मावळ्‍याला होती. कौटुंबिक सोहळ्‍यापेक्षा राष्‍ट्रीय सोहळा अधिक महत्त्वाचा याची जाणीव छत्रपती शिवरायांच्‍या काळातील प्रत्‍येक नागरिकाला होती.

‘शिवचरित्रा’तील या आणि अशा अनेक घटना सावरकर यांना प्रेरित करत होत्‍या; म्‍हणूनच सावरकर बंधूंनीही कौटुंबिक जीवनापेक्षा राष्‍ट्रीय जीवनाला प्राधान्‍य दिले. स्‍वातंत्र्य समराच्‍या यज्ञकुंडात स्‍वतःचीही समिधा पडली पाहिजे आणि हा स्‍वातंत्र्याचा यज्ञकुंड सतत धगधगत ठेवला पाहिजे; म्‍हणून संपूर्ण सावरकर कुटुंब भारतमातेच्‍या चरणी समर्पित झाले, ते केवळ छत्रपती शिवरायांच्‍या प्रेरणेमुळेच !

५. स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितलेली राष्‍ट्रासाठी नागरिकांची भावना

‘हिंदुपदपादशाही’ या ग्रंथात राष्‍ट्रासाठी नागरिकांची काय भावना असली पाहिजे ?’, हे सांगतांना सावरकर लिहितात…

‘‘परकीय राज्‍यकर्त्‍याकडून पाठ थोपटून घेणारा आणि हांजी हांजी करणारा त्‍यांचा सेवक व्‍हायचे नाही, हे निश्‍चित ! इतर साहाय्‍याला येवोत न येवोत, आपण तरी सर्वस्‍वावर पाणी सोडून आपल्‍या पूर्वजांच्‍या अस्‍थींचे आणि देवतांच्‍या देवळांचे संरक्षण करण्‍यासाठी प्रयत्न करायचा, युद्धे भांडायची आणि प्रसंगी आपल्‍यापेक्षा बलिष्‍ठ शत्रूशी लढता लढता मरायचे. त्‍यात यश मिळवण्‍याचे आपल्‍या दैवी (नशिबात) असेल आणि मरण न येता समर भूमीवर विजयश्री आपल्‍याला माळ घालणार असले, तर विक्रमादित्‍य किंवा शालिवाहन यांच्‍याप्रमाणेच आपल्‍यालाही आज कित्‍येक पिढ्यांना पडलेली स्‍वप्‍ने ज्‍यात संस्‍मरणीय रितीने पूर्ण झालेली दिसतील, अशा आणि जे मिळवण्‍यासाठी आपल्‍या धर्मातील साधू आणि संत यांनी आजपर्यंत आशायुक्‍त अंत:करणांनी देवाला आळवले, अशा हिंदूंच्‍या एका श्रेष्‍ठ आणि वैभवशाली साम्राज्‍याचा पाया घालण्‍याचे श्रेय आपल्‍याला लाभेल !’’

या ग्रंथात लिहिल्‍याप्रमाणे सावरकर तशा प्रकारचे जीवन जगले. त्‍यांनीही असेच ठणकावून सांगितले, ‘‘याल तर तुमच्‍यासह, न याल तर तुमच्‍या वाचून, विरोध कराल तर तुमच्‍या विरोधाला न जुमानता आम्‍ही आमचा देश स्‍वतंत्र करू.’’

६. सावरकर यांच्‍या ‘अखंड हिंदुस्‍थान स्‍थापन’ संकल्‍पनेमागील छत्रपती शिवरायांची प्रेरणा

एका तरुणाने क्रांतीयुद्धाची उठवणी केली. वर्ष १६४५ मध्‍ये छत्रपती शिवरायांनी आपल्‍या एका सवंगड्याला एक पत्र पाठवले. छत्रपती शिवरायांचा हा सवंगडी विजापूरच्‍या शहाच्‍या विरोधात लढला होता. त्‍याचे एक कृत्‍य म्‍हणजे त्‍याच्‍याकडून घडलेले राजद्रोहाचे पातक आहे, असा त्‍याच्‍यावर आरोप केला. त्‍या आपल्‍या सवंगड्याला छत्रपती शिवराय पत्र लिहून कळवतात…

‘‘जर कुणाशी एकनिष्‍ठ रहायला आपण बांधले गेलो असलो, तर ते कुणा शाहला किंवा बादशाहला नाही. आपली बांधिलकी परमेश्‍वराशी आहे.’’ असे सांगून छत्रपती शिवरायांनी उच्‍च नीतीमत्तेची भावना आपल्‍या सवंगड्यांमध्‍ये जागृत केली. हिंदवी स्‍वराज्‍याची स्‍थापना करण्‍याची शपथ शिवरायांनी घेतली असली, तरी ‘ती भगवंताची इच्‍छा आहे’, असे छत्रपती शिवरायांनी मानले.

हिंदु धर्माच्‍या संरक्षणासाठी परकीय मुसलमानी सत्तेला उलथून पाडण्‍यासाठी, स्‍वतंत्र आणि समर्थ असे हिंदवी साम्राज्‍य स्‍थापन करण्‍यासाठी छत्रपती शिवरायांनी आमूलाग्र हिंदू चळवळ केली. छत्रपती शिवरायांची ही चळवळ सावरकर यांना ‘अखंड हिंदुस्‍थान स्‍थापन’ करण्‍यासाठी प्रेरणा देत होती, हे विसरून चालणार नाही; म्‍हणूनच सावरकर कोणत्‍याही यादवीला सामोरे जाण्‍यासाठी सिद्ध होते. छत्रपती शिवरायांनी आपल्‍या नागरिकांमध्‍ये निर्माण झालेली दास्‍यवृत्ती आणि त्‍यामुळे निर्माण झालेली दुर्बल मने सुदृढ अन् बलवान करण्‍यासाठी, तसेच त्‍यांच्‍यातील प्रतिकार शक्‍ती वाढवण्‍यासाठी ‘हर हर महादेव’, अशी वीर गर्जना केली.

७. स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘शिवचरित्रा’विषयी केलेले महत्त्वपूर्ण भाष्‍य

‘शिवचरित्र’ सर्वांना आकर्षित करणारे का आहे ?’, याचे कारण सांगतांना  स्‍वातंत्र्यवीर सावरकर ‘हिंदुपदपादशाही’ या ग्रंथात लिहितात…

‘‘छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासस्‍वामी यांचे खरे मोठेपण हेच आहे की, त्‍यांनी चालू केलेली चळवळ त्‍यांच्‍या नंतर दीर्घकाळ टिकली. एवढेच नाही, तर त्‍यांच्‍याच सारख्‍या समर्थ आणि देशभक्‍त विभूती शतावरी संघटनापटूंची अन् रण धुरंधरांची, विरांची, हुतात्‍म्‍यांची एका मागून एक अखंड परंपरा निर्माण झाली. या परंपरेने त्‍याच पवित्र कार्याप्रीत्‍यर्थ घनघोर लढाया लढल्‍या. राष्‍ट्राला हिंदुपदपादशाहीच्‍या ध्‍येयाकडे नेले. जे वैभव पाहून प्रत्‍यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी स्‍वतःचा राज्‍याभिषेक करवला, तेव्‍हा त्‍यांच्‍या हातात एक पुरा प्रांतही नव्‍हता; पण जेव्‍हा त्‍यांच्‍या अनुयायाने राघोबादादाच्‍या अधिपत्‍याखाली थेट लाहोरमध्‍ये प्रवेश केला आणि मराठी घोडा सिंधू नदीच्‍या तीरावर विजय भरार्‍या मारू लागला, तेव्‍हा एक संपूर्ण खंड त्‍यांच्‍या चरणाशी लोळू लागला. त्‍यांचे ते कार्य महान आणि अधिक पूर्ण होते. छत्रपती शिवाजी महाराजांना मृत्‍यूने गाठले; पण इकडे औरंगजेब जिवंत होता. तरीही त्‍याला महाराष्‍ट्राची तसूभर भूमी जिवंत असेपर्यंत  जिंकता आली नाही. औरंगजेबाला आणि त्‍याच्‍या अहिंदू महत्त्वाकांक्षांना नगरच्‍या एका सामान्‍य थडग्‍यात अंतिम मूठ माती मिळाली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही, तर त्‍यांनी निर्माण केलेल्‍या महाराष्‍ट्राने दिली. रायगडावर पेरलेल्‍या स्‍वराज्‍य स्‍थापनेच्‍या बीजाचे रूपांतर मराठी साम्राज्‍याच्‍या प्रचंड वृक्षात झाले.’’

छत्रपती शिवरायांनी ‘हिंदवी स्‍वराज्‍या’ची स्‍थापना केली आणि त्‍यानंतर त्‍यांच्‍या कार्यापासून प्रेरणा घेऊन नंतरच्‍या वीर मराठ्यांनी त्‍याचे हिंदु साम्राज्‍यात परिवर्तन केले. या दोन घटनांना जोडणारी घटना म्‍हणून स्‍वातंत्र्यवीर सावरकर छत्रपती शिवरायांच्‍या मृत्‍यूकडे पहातात.

८. ‘अभिनव भारत’ संघटना स्‍थापण्‍यामागील कारण

श्रीराम आणि श्रीकृष्‍ण यांनी त्‍यांच्‍या काळातील शत्रू मारले. त्‍यांच्‍यावर विजय संपादन करून न्‍यायाचे, नैतिकतेचे, सत्‍याचे राज्‍य प्रस्‍थापित केले. आर्य चाणक्‍य यांनी त्‍यांच्‍या काळातील शत्रूचा पराभव करून हिंदुस्‍थानची भूमी सुरक्षित ठेवली. विक्रमादित्‍य, शालिवाहन यांसारख्‍या राजांनी परकीय आक्रमकांना नष्‍ट करून आपल्‍या भू सीमा सुरक्षित ठेवल्‍या. छत्रपती शिवरायांनी त्‍यांच्‍या काळातल्‍या इस्‍लामी सत्तांना आपल्‍या टाचेखाली दाबून हिंदवी स्‍वराज्‍याची स्‍थापना केली. त्‍यांचा हा शौर्याच्‍या पराक्रमाचा वारसा आपणच शौर्याने, पराक्रमाने जतन करायला हवा. या जाणिवेने प्रेरित होऊन ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकण्‍यासाठी सावरकर यांनी सशस्‍त्र क्रांतीची संघटना उभारली. ‘अभिनव भारत’ या क्रांतीकारी संघटनेने ब्रिटीश सरकारची झोप उडवली.

९. छत्रपती शिवरायांप्रमाणे सावरकर यांना क्रांतीकारक मावळ्‍यांविषयी वाटणारी कृतज्ञता !

सावरकर यांना असंख्‍य सहकारी लाभले, जे छत्रपती शिवरायांच्‍या मावळ्‍यांप्रमाणेच शूरवीर योद्धे होते. अनेकांनी भारतमातेच्‍या स्‍वातंत्र्यासाठी हालअपेष्‍टा सहन केल्‍या. हसत हसत फासावर चढून आपले बलीदान दिले. स्‍वतःला राज्‍याभिषेक करून घेतांना छत्रपती शिवरायांना आपल्‍या सवंगड्यांचे स्‍मरण झाले. त्‍यांच्‍याविषयीची अखंड कृतज्ञता छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या अंत:करणामध्‍ये नंदादीपासारखी तेवत होती.

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या मनातही आपल्‍या सहकार्‍यांविषयीची कृतज्ञतेची भावना सदैव जागी होती; म्‍हणूनच शपथेच्या सांगता समारंभाच्‍या वेळी भाषण करतांना सावरकर म्‍हणाले, ‘‘देशाच्‍या स्‍वातंत्र्यासाठी मी घेतलेली शपथ देश स्‍वतंत्र झाल्‍यामुळे आता पूर्णत्‍वास गेली आहे. त्‍या शपथेची सांगता करणे क्रमप्राप्‍त आहे. जिवंत असलेल्‍या क्रांतीकारकांचा प्रतिनिधी म्‍हणून मी आज आपल्‍यासमोर उभा आहे. ज्‍या क्रांतीकारकांनी आपल्‍या प्राणांची आहुती दिली, त्‍यांचे प्रतिनिधित्‍व करणारा क्रांतीकारक म्‍हणून आजच्‍या सांगता समारंभाचे अध्‍यक्षपद सुभाषबाबूंना (नेताजी सुभाषचंद्र बोस यांना) मी देऊ इच्‍छितो; म्‍हणूनच त्‍यांच्‍या प्रतिमेची स्‍थापना करण्‍यात आली आहे.’’

सावरकर राष्‍ट्राविषयीही अत्‍यंत संवेदनशील होते. ज्‍या ज्‍या थोर पुरुषांनी आपल्‍या देशासाठी, संस्‍कृतीसाठी, धर्मासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले, त्‍या सर्वांविषयी कृतज्ञतेचा भाव मनात ठेवून सावरकर यांनी राष्‍ट्रकार्य केले. हे राष्‍ट्रकार्य करतांना आपण ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत’, याचे विस्‍मरण त्‍यांनी होऊ दिले नाही.

१०. सावरकर यांची रणनीती छत्रपती शिवरायांच्‍या युद्धनीतीचे स्‍मरण करून देणारी !

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांची राजनीती ही छत्रपती शिवरायांच्‍या पदचिन्‍हांचा मागोवा घेत मार्गक्रमण करत होती, याची आपल्‍याला वेळोवेळी प्रचीती येते. शत्रूची अडचण, शत्रूवर आलेले संकट, हीच आपल्‍यासाठी असलेली विजयाची पर्वणी आहे, हे छत्रपती शिवरायांच्‍या युद्धनीतीचे सूत्र सावरकर यांनी आत्‍मसात केले होते; म्‍हणूनच दुसरे महायुद्ध जवळ येऊन ठेपले असतांना सावरकर यांनी आपल्‍या देशातील तरुणांना सैन्‍यात भरती होण्‍यास सांगितले. त्‍याचा योग्‍य तो उपयोग देश स्‍वतंत्र करण्‍यासाठी झाला. दुसर्‍या महायुद्धात सैन्‍यात सहभागी झालेल्‍या सैनिकांनीच संकटात सापडलेल्‍या ब्रिटीश सरकारला कोंडीत पकडले आणि देश स्‍वतंत्र केला. सावरकर यांची ही रणनीती छत्रपती शिवरायांच्‍या युद्धनीतीचे स्‍मरण करून देण्‍यास पुरेशी आहे.

११. सशस्‍त्र क्रांतीचा लढा लढतांना सावरकर यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श समोर ठेवणे

प्रभु श्रीराम आणि श्रीकृष्‍ण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रमुख दैवते होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘शत्रूला दिलेले वचन पाळले नाही’, ‘शत्रूला दिलेला शब्‍द पाळला नाही’, हे करतांना त्‍यांच्‍या समोर श्रीकृष्‍णाचा आदर्श होता. श्रीकृष्‍णाने अधर्माचे उच्‍चाटन करून धर्माची प्रस्‍थापना करण्‍यासाठी, अन्‍यायाला नष्‍ट करून न्‍याय प्रस्‍थापित करण्‍यासाठी आणि अनैतिकतेला मूठमाती देऊन नैतिकतेची पायाभरणी करण्‍यासाठी आयुष्‍यभर कार्य केले. या कार्याच्‍या आड येणारे वचन, प्रतिज्ञा श्रीकृष्‍णाने बिनधास्‍तपणे धुडकावून लावली. श्रीकृष्‍णाची ही शिकवण छत्रपती शिवरायांनी तंतोतंत आपल्‍या आयुष्‍यात उतरवली. स्‍वातंत्र्यवीर सावरकरांनीही सशस्‍त्र क्रांतीचा लढा लढत असतांना छत्रपती शिवरायांचा हा मंत्र आपल्‍या उराशी जपला. देश स्‍वातंत्र्याच्‍या ध्‍येयाच्‍या आड येणारी प्रत्‍येक गोष्‍ट स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी लाथाडली आहे. ‘देशाचे स्‍वातंत्र्य हे सर्वोच्‍च ध्‍येय आहे. ते ध्‍येय गाठण्‍यासाठी वचने द्यायची असतात; पण ते वचन / शपथ पाळणे जर स्‍वातंत्र्याच्‍या उच्‍च ध्‍येयाच्‍या आड येत असेल, तर तिला मूठमाती देणे, हीच राष्‍ट्रनिष्‍ठा आहे. त्‍यामुळे अशी वचने धुडकावून लावणे, हेच पुण्‍य कर्म आहे.’ सावरकर यांनी त्‍यांच्‍या आयुष्‍यात तेच केले; म्‍हणून सावरकर यांना कधीही दोष देता येणार नाही, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे.

स्‍वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शिवराय यांचे चरित्र पाहिले, तर आपल्‍याला निश्‍चितपणे असे अनुमान काढता येते की, स्‍वातंत्र्यवीर सावरकर हा छत्रपती शिवरायांचा निष्‍ठावान मावळा आहे.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (४.५.२०२३)

संपादकीय भूमिका

सावरकर बंधूंनी कौटुंबिक जीवनापेक्षा राष्‍ट्रीय जीवनाला प्राधान्‍य दिले आणि ते भारतमातेच्‍या चरणी समर्पित झाले !