गोवा : पालिका संचालनालयाच्या आदेशानुसार म्हापसा पालिकेची अतिक्रमणविरोधी मोहीम २ दिवस स्थगित

म्हापसा – पालिका प्रशासन संचालनालयाकडून म्हापसा पालिकेच्या पदपथावरील अतिक्रमणाच्या विरोधातील मोहिमेला स्थगिती देण्यात आली आहे. यानुसार पालिका २ दिवस मोहीम स्थगित करणार असून त्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मोहीम नव्या जोमाने आरंभ करणार, असे म्हापसा पालिकेचे उपनगराध्यक्ष विराज फडके यांनी सांगितले. पालिका संचालनालयाचा आदेश उच्च न्यायालयाच्या आदेशापेक्षा वरचढ ठरू शकत नाही, असे ते म्हणाले.

म्हापसा पालिका क्षेत्रातील कोणत्याही दुकानातील किंवा स्टॉलवरील साहित्य जप्त करतांना त्याचा पंचनामा होणे आवश्यक आहे; परंतु पदपथावर मांडलेले साहित्य जप्त करतांना पंचनाम्याची आवश्यकता नाही. पदपथावर साहित्य मांडणे, ही अवैध कृती आहे. पालिका प्रशासनाने पंचनामा न केल्यावरून अतिक्रमणविरोधी मोहीम राबवतांना कार्यपद्धतींचे पालन केले जात नसल्याचे म्हटले आहे. संचालनालयाने म्हापसा पालिका मुख्याधिकार्‍यांना अंतिम निर्णय येईपर्यंत कोणतेही साहित्य जप्त न करण्याचा आदेश दिला आहे. म्हापसा पालिकेने १८ मेपासून अतिक्रमणविरोधी मोहिमेला प्रारंभ केला होता.