धुपाच्या नावाने मंदिरावर हक्क सांगण्याचा धोका हिंदू पत्करणार नाहीत ! – आचार्य तुषार भोसले, भाजप

भाजपाचे आचार्य तुषार भोसले (छायाचित्र सौजन्य : ए.बी.पी. माझा)

मुंबई – हळूहळू मंदिरात शिरायचे, परंपरा दाखवायची, व्हिडिओ चित्रीकरण करून पुरावे निर्माण करायचे आणि ३०-४० वर्षांनी मंदिरावर दावा करायचा. हे आतापर्यंत हिंदूंनी सहन केले आहे. आता हिंदू हा धोका पत्करायला सिद्ध नाहीत, असे विधान भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केले. २२ मे या दिवशी भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या वेळी आचार्य तुषार भोसले म्हणाले, ‘‘मंदिरामध्ये आमची जागा आहे. आमचे पूर्वज धूप दाखवत आले आहेत. हेच आतापर्यंत हिंदु समाजाने सहन केले आहे. मंदिरामध्ये धूप दाखवण्याची कोणतीही परंपरा नसल्याचे त्र्यंबकेश्वर मंदिर समितीने विशेष पोलीस पथकाला सांगितले आहे. उरुसामध्ये सहभागी झालेल्यांपैकी कोण कोण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, याची माहिती मला मिळाली आहे. ही माहिती मी विशेष पोलीस पथकाकडे दिली आहे.’’

धूप दाखवण्याची परंपरा १०० वर्षांपूर्वीची म्हणणार्‍या संजय राऊत यांनी पुरावे द्यावेत !

मंदिरात धूप दाखवण्याची परंपरा १०० वर्षांपासून असल्याचे म्हणणार्‍या संजय राऊत यांनी त्याविषयी पुरावे द्यावेत. संजय राऊत यांनी हिंदु धर्माच्या विरोधातील लोकांना बळ देण्याचे काम केले आहे. संजय राऊत यांचा स्वतःच्या धर्मातील लोक आणि मंदिर समिती यांवर विश्वास नाही. त्र्यंबकेश्वर गावातील लोकांनी मंदिरात धूप दाखवण्याची कुठलीही परंपरा नाही. यासाठी ग्रामस्थांनी स्वाक्षरी मोहीम चालू केली आहे, असे या वेळी आचार्य तुषार भोसले यांनी सांगितले.