बनावट कागदपत्रांद्वारे भूमी बळकावल्याची दक्षिण गोव्यात एका दशकात अनेक प्रकरणे !

अनेक हेक्टर भूमी लुटली : भूमी लुटण्यामध्ये सरकारी अधिकार्यांचा हात असल्याचा अन्वेषण अधिकार्यांचा दावा

प्रतीकात्मक छायाचित्र

पणजी, २० मे (वार्ता.) – दक्षिण गोव्यात बनावट कागदपत्रे सिद्ध करून भूमी बळकावल्याच्या अनेक घटना गेल्या एका दशकात घडल्या आहेत. याद्वारे अनेक हेक्टर भूमी बळकावण्यात आली आहे. या प्रकरणांत मोठ्या प्रमाणावर पैशांचा व्यवहार झाला आहे. मामलेदार कार्यालयापासून ते उप-प्रबंधक (सब रजिस्ट्रार) कार्यालयापर्यंत संबंधित कर्मचारी किंवा अधिकारी यांनी भूमी बळकावण्यास साहाय्य केले आहे.

भूमी बळकावल्याच्या प्रकरणी सरकारस्थापित अन्वेषण अधिकारी तथा पोलीस निरीक्षक सूरज सावंत म्हणाले, ‘‘भूमी बळकावल्याच्या प्रकरणी भूमीची ‘पॉवर ऑफ अटर्नी’ (मुखत्यारपत्र) दिलेली व्यक्ती जिवंत आहे कि नाही ? याची पडताळणी न करताच मामलेदार कार्यालयात भूमींची ‘म्युटेशन’ (भूमीच्या मालकी हक्कात पालट करणे) प्रक्रिया करण्यात आली आहे. हा एक धक्कादायक प्रकार आहे.’’

विशेष अन्वेषण पथकाच्या अन्वेषणातून भूमी बळकावल्याच्या प्रकरणी बार्देश तालुक्याच्या मामलेदारांचा अनेक प्रकरणांमध्ये हात असल्याचे उघड झाले आहे. मामलेदार राहुल देसाई, पुरातत्व विभाग आणि अन्य खात्यांतील कर्मचारी यांना कह्यात घेण्यात आले होते. विशेष अन्वेषण पथक आता कुणावर कारवाई करणार ? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

संपादकीय भूमिका

भूमी बळकावल्याच्या प्रकरणांतील सरकारी अधिकार्यांवर कठोरातील कठोर कारवाई झाली, तरच पुन्हा कुणीही भ्रष्टाचार करण्यास धजावणार नाही !