एल्.ई.डी. मासेमारीविषयी अभ्यास करून अनुमती दिली जाईल ! – केंद्रीय मत्सोद्योग मंत्री रूपाला

(एल्.ई.डी. मासेमारी म्हणजे रात्रीच्या वेळी मोठ्या प्रकाशझोतात केली जाणारी मासेमारी)

एल्.ई.डी. मासेमारी

मडगाव, १९ मे (वार्ता.) – एल्.ई.डी.च्या उजेडात मासेमारी करण्यावरील बंदी उठवावी, या मागणीसंबंधी वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय मासेमारी, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रूपाला यांनी म्हटले आहे. सागर परिक्रमा कार्यक्रमाच्या पाचव्या टप्प्याच्या अंतर्गत त्यांनी १९ मे या दिवशी गोव्याला भेट दिली. त्यांनी वास्कोमध्ये मासेमारी जेटीची पहाणी केली आणि नंतर मडगावमध्ये मासेमारी व्यवसायाशी संबंधित व्यक्तींशी चर्चा केली.

ते पत्रकारांना म्हणाले, ‘‘एल्.ई.डी.च्या उजेडात मासेमारी करण्याला जी बंदी आहे ती उठवावी, अशी मागणी आहे. याविषयी इतर देशांमध्ये एल्.ई.डी.च्या उजेडात मासेमारी केली जाते का ? याचा अभ्यास केला जाईल. तसेच तांत्रिक आणि वैज्ञानिक दृष्टीने त्याचा अभ्यास करून निर्णय दिला जाईल.’’ राज्यातील मासेमार बांधवांसाठी शीतगृहाची (‘कोल्ड स्टोरेज’ची) उभारणी करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

या वेळी गोव्याचे मत्सोद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, आमदार वेन्झी व्हिएगस, क्रूझ सिल्वा आदी उपस्थित होते.