मुंबई, १९ मे (वार्ता.) – राज्यशासनाच्या वतीने २ जून या दिवशी रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेकदिन साजरा करण्यात येणार आहे. या भव्य सोहळ्याच्या पूर्वसिद्धतेविषयी नुकतीच सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विविध शिवप्रेमी संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली. त्यात रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टर किंवा ड्रोन यांद्वारे पुष्पवृष्टी करण्याचे ठरवण्यात आले. शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले हेही या बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने १ ते ७ जून या कालावधीत रायगडावर हा भव्य सोहळा साजरा केला जाणार आहे. महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेकदिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.