उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कोल्हापूर येथील नम्र आणि ईश्वरावर श्रद्धा असणारा बालसाधक कु. विवान अमित कुलकर्णी (वय ८ वर्षे) याने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

‘वर्ष २०१७ मध्ये ‘कु. विवान अमित कुलकर्णी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून तो ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२३ मध्ये त्याची पातळी ६१ टक्के झाली आहे. आता त्याच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे त्याची साधनेत प्रगती होत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१३.५.२०२३)
कु. विवान याचा सत्कार करतांना सद्गुरु स्वाती खाडये

कोल्हापूर – देवावर श्रद्धा असणारा, नम्र, छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवा झेंडा यांच्याप्रती विशेष आस्था असणारा बालसाधक कु. विवान अमित कुलकर्णी (वय ८ वर्षे) याने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, असे घोषित करण्यात आले. कोल्हापूर येथे कुलकर्णी कुटुंबियांच्या रहात्या घरी १७ मे या दिवशी एका कौटुंबिक सोहळ्यात सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी हे गुपित उलगडले. सद्गुरु स्वाती खाडये यांच्या हस्ते भेटवस्तू आणि प्रसाद देऊन विवानचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी ढवळी, गोवा येथे वास्तव्यास असणार्‍या श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी (विवानची आजी), अश्विनी कुलकर्णी (विवानची आत्या), कोल्हापूर येथील श्री. अमित कुलकर्णी (विवानचे बाबा), आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) आदी उपस्थित होते. या वेळी श्रीमती अंजली कुलकर्णी आणि अश्विनी कुलकर्णी यांना भावाश्रू अनावर झाले. सद्गुरु स्वाती खाडये यांनी या प्रसंगी ‘६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे म्हणजे काय ? त्याचे महत्त्व काय ?’ हे उपस्थितांना विशद केले.

कु. विवानला लहानपणापासून देवाची ओढ आहे ! – श्रीमती अंजली कुलकर्णी (विवानची आजी)

विवानचा जन्म गोकुळाष्टमीला झाला असून त्याला लहानपणापासून देवाची ओढ आहे. आज दुपारपासून सातत्याने भावजागृती होत होती आणि देवाविषयी कृतज्ञता वाटत होती. त्याचे गुपित आता उलगडले.

कु. विवान कुलकर्णी याची कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

उद्या ज्येष्ठ शुक्ल द्वितीया (२१.५.२०२३) या दिवशी कु. विवान अमित कुलकर्णी याचा व्रतबंध आहे. त्यानिमित्त त्याची आजी (वडिलांची आई) आणि आत्या यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. विवान कुलकर्णी

कु. विवान कुलकर्णी याला व्रतबंधानिमित्त सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !

श्रीमती अंजली कुलकर्णी

१. श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी (विवानची आजी (वडिलांची आई), वय ७३ वर्षे), ढवळी, फोंडा, गोवा.

१ अ. नीटनेटकेपणा : ‘विवान प्रत्येक कृती नीटनेटकेपणाने आणि परिपूर्ण करतो. कंटाळा आला; म्हणून तो एखादी गोष्ट मध्येच सोडून देत नाही.

१ आ. प्रेमभाव

१. मला सर्दी झाल्यावर त्याविषयी मी विवानला सांगितले नसले, तरीही तो स्वतः स्वयंपाकघरात जाऊन पाणी गरम करून ते नीट झाकून ठेवतो आणि मला म्हणतो, ‘‘आजी, तुला सर्दी झाली आहे. तू थंड पाणी पिऊ नकोस.’’ तो मला थोड्या थोड्या वेळाने गरम पाणी पिण्याची आठवणही करतो.

२. माझ्या डोळ्यातील मोतीबिंदूचे शस्त्रकर्म झाले. तेव्हा ‘डोळ्यात औषधाचे थेंब घालतांना माझी हालचाल झाली, तर मला वेदना होतील’, असा विचार करून तो माझे हात धरून ठेवायचा. औषध घालून झाल्यावर तो माझ्या अंगावर पांघरूण घालून मला म्हणायचा, ‘‘आजी, डोळ्यात औषध घालून झाले आहे. आता तू शांत झोप.’’

१ इ. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी पुष्कळ प्रेम असणे

१. ‘विवानची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पुष्कळ श्रद्धा आहे. त्याने एक किल्ला विकत घेऊन तो घराच्या बाहेरच्या मार्गिकेत ठेवला आहे. त्यावर त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवली आहे. त्या किल्ल्याच्या मागच्या बाजूला तो भगवा झेंडा लावतो.

२. किल्ल्याच्या समोर कुणी चप्पल काढून ठेवली, तर तो त्यांना ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे चप्पल काढायला नको’, याची जाणीव करून देतो.

३. विवानसाठी ‘भगवा ध्वज’ हे मोठे आस्थास्थान आहे. गणेशविसर्जन किंवा शिवजयंती या दिवशी असणार्‍या मिरवणुकांच्या वेळी तो स्वतःचा भगवा ध्वज घेऊन मिरवणूक पहायला जातो.

१ ई. देवाची ओढ

१ ई १. घरातील देवांची पूजा करणे : तो २ – ३ वर्षांचा असतांना देवघरातील सर्व देवांची पूजा करायचा. त्यासाठी तो घरातील सर्वांना बोलावून आणायचा आणि उदबत्ती लावून देवाची आरती करायचा. आताही त्याला देवाची पूजा आणि आरती करायला पुष्कळ आवडते.

१ ई २. मंदिरात जाऊन देवतांचे दर्शन घेण्याची आवड असणे : विवानला अगदी लहानपणापासून सर्व मंदिरांत जाऊन दर्शन घ्यायला आवडते. अनेकदा तो मला ‘श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात जाऊया’, असे सांगतो. तिथे गेल्यावर तो केवळ महालक्ष्मीदेवीलाच नाही, तर मंदिर परिसरातील सर्व देवतांच्या मंदिरात जाऊन नमस्कार करतो. तो मंदिर परिसरातील मंदिरे आणि घराजवळील श्रीराम, दत्तगुरु, हनुमान अन् शिव यांच्या मंदिरात जातो.

१ ई ३. खेळणे घेण्यासाठी साठवलेले पैसे मंदिरांत अर्पण करणे : एकदा त्याने खेळणे घेण्यासाठी पैसे साठवले होते. काही दिवसांनी अकस्मात् तो मला म्हणाला, ‘‘आजी, आपण या पैशांचे खेळणे आणायला नको. हे सगळे पैसे आपण देवाला देऊया.’’ त्यानंतर त्याने ते साठवलेले सर्व पैसे वेगवेगळ्या देवतांच्या मंदिरांत अर्पण केले.

१ ई ४. तो प्रतिदिन देवाला नमस्कार करून शाळेला जातो.’

अश्‍विनी कुलकर्णी

२. अश्विनी कुलकर्णी (आत्या), ढवळी, फोंडा, गोवा.

२ अ. उत्तम स्मरणशक्ती : ‘विवानची स्मरणशक्ती उत्तम आहे. त्याला सांगितलेले कुठलेही सूत्र तो विसरत नाही.

२ आ. उत्साही : विवान दिवसभर उत्साही असतो. त्याला पाहून चैतन्य जाणवते.

२ इ. मृदू आणि मधुर आवाज : विवानच्या आवाजात मृदूता आहे. त्याचा आवाजही मधुर आहे. त्यामुळे त्याच्याशी बोलावेसे वाटते.

२ ई. नम्रता : विवान घरातील सर्वांशी नेहमी नम्रतेने बोलतो. त्याला काही हवे असेल किंवा कुणाकडे काही मागायचे असेल, तर तो अधिकारवाणीने ‘मला दे’, असे म्हणत नाही. ‘मला ती वस्तू देशील का ?’, असे तो नम्रपणे विचारतो. मित्रांशीही तो तसेच बोलतो.

२ उ. प्रेमभाव

१. त्याच्यातील प्रेमभावामुळे तो सर्वांना त्याच्याकडे आकृष्ट करून घेतो. त्याला कुणाचीही ओळख लागत नाही. तो सहजपणे सर्वांशी बोलतो आणि सर्वांमध्ये मिसळतो.

२. त्याचे पू. पणजींवर (पू. (श्रीमती) आशा दर्भे (वडिलांच्या आईची (श्रीमती अंजली कुलकर्णी यांची) आई), सनातनच्या ७१ व्या (व्यष्टी) संत, वय ९४ वर्षे यांच्यावर) पुष्कळ प्रेम आहे. त्या रुग्णाईत असतांना आम्ही त्यांच्याकडे गेल्यावर विवान पू. आजींना म्हणाला, ‘‘पणजीआजी, तू आता काही करू नकोस. तुला बरे नाही ना ? तू केवळ बसून रहा.’’ असे बोलून त्याने स्वत:कडचा लाडू पू. आजींना दिला.

२ ऊ. आत्याची चूक तत्त्वनिष्ठपणे सांगणे : एकदा मी आईशी बोलत असतांना ती मला सांगत असलेले सूत्र मी स्वीकारले नाही आणि तिच्याशी प्रतिक्रियात्मक बोलले. तेव्हा विवान मला म्हणाला, ‘‘आत्या, ती तुझी आई आहे ना ? मग तू तिचे ऐकायला पाहिजे ना !’’ ते ऐकून मला पुष्कळ खंत वाटली आणि त्याचे कौतुकही वाटले.

२ ए. घरकामात साहाय्य करणे : विवान त्याच्या आईला (सौ. गिरिजा कुलकर्णी यांना) ‘घरातील लादी पुसणे, स्वच्छता करणे किंवा भाजी निवडणे’, यांसाठी साहाय्य करतो. जवळच असलेल्या बाजारातून एखादी वस्तू किंवा दुकानातून औषध आणायचे असेल, तर तो ते आणून देतो.

‘हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवा, ‘आपणच आम्हाला विवानमधील दैवी गुणांची जाणीव करून दिली आणि त्यातून शिकण्याची संधी दिलीत’, याबद्दल आम्ही आपल्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहोत.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २९.४.२०२३)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.