कोल्हापूर, ९ मे (वार्ता.) – हुपरी येथे सामाजिक माध्यमांद्वारे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची अपकीर्ती करण्यात आली. याच समवेत कर्नाटक राज्यात काँग्रेसने बजरंग दलाची तुलना राष्ट्रविरोधी संघटना ‘पी.एफ्.आय.’ समवेत केली. या दोन्हींच्या निषेधार्थ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, तसेच विश्व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ९ मे या दिवशी निषेध आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी हनुमान चालीसाचे वाचन करण्यात आले. आंदोलनानंतर छत्रपती शिवाजी महाराज, तसेच महापुरुष यांचा जाणीवपूर्वक अवमान आणि हेतू:पुरस्सर अपकीर्ती करणार्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांनी स्वीकारले.
या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे म्हणाले, ‘‘सातत्याने हिदूंची अस्मिता आणि श्रद्धास्थाने यांची विटंबना केली जात आहे. यापुढील काळात असे प्रकार आता सहन केले जाणार नाहीत. जशास तसे उत्तर दिले जाईल आणि याचे सर्वस्वी दायित्व प्रशासनाचे असेल.’’ विश्व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री अधिवक्ता सुधीर वंदूरकर-जोशी म्हणाले, ‘‘काँग्रेसकडून सनातन हिंदु धर्माचा अवमान करण्याचे प्रकार वारंवार केले जात आहेत. बजरंग दल ही राष्ट्रप्रेमी संघटना असून त्याची तुलना ‘पी.एफ्.आय.’शी करणे चुकीचे आहे.’’
या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. शिवाजीराव मोटे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री गणेश जाधव, अवधूत चौगुले, सुमेध पोवार, आशिष पाटील, प्रसाद खोत, पवन देसाई, संतोष सावंत, रोहित अतिग्रे, भाजपचे श्री. दिलीप मेत्राणी, विश्व हिंदु परिषद-बजरंग दल प्रसिद्धीप्रमुख श्री. राजाभाऊ मकोटे, विश्व हिंदु परिषदेचे श्री. विजयकुमार पाटील, श्री. किशोर जाधव यांसह अन्य उपस्थित होते.