|
छत्रपती संभाजीनगर – सरकारची कोणतीही मान्यता न घेता राज्यात अनधिकृतपणे चालू असलेल्या बनावट शाळांवर गुन्हे नोंद होणार आहेत. बृहन्मुंबई, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यासाठी शिक्षण विभागाने आदेश लागू केले आहेत. राज्यात केंद्रीय मंडळाच्या नावाने ८०० हून अधिक शाळा अनधिकृतपणे चालू आहेत. याची गंभीर नोंद काही दिवसांपूर्वी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी घेत त्यांच्यावर कारवाई चालू केली होती. (एवढ्या शाळा चालू होईपर्यंत संबंधित अधिकारी झोपले होते का ? त्यांचीही चौकशी करणे आवश्यक आहे. – संपादक)
त्याच पार्श्वभूमीवर राज्य मंडळाव्यतिरिक्त इतर मंडळाच्या शाळांच्या वैधता प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार ज्या अनधिकृत शाळा आहेत, त्या सर्व शाळा ३० एप्रिलपर्यंत बंद करून तसा अहवाल सादर करण्यासाठी आयुक्तांनी आदेश दिले होते. त्यानुसार अनधिकृत शाळा बंद करण्यासाठी, तसेच त्यांच्यावर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यासाठी आदेश लागू करण्यात आले आहेत.
ज्या अनधिकृत शाळांकडून शासनास प्रदान केलेल्या रकमेचे चलन, दंड भरत नसलेल्या शाळांचा सातबारा उतारा, मालमत्ता पत्रक आणि मान्यताप्राप्त शाळेत समायोजित केलेल्या विद्यार्थ्यांची प्रमाणित सूची इत्यादी कागदपत्रे पुरावा स्वरूपात सादर केल्यास त्याचे ना हरकत प्रमाणपत्र, संलग्नता प्रमाणपत्र इत्यादी पडताळणी करून त्यांना मुभा दिली जाणार आहे.