इंद्रायणीच्या वाढत्या प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष !

दूषित, रसायनयुक्त पाण्यामुळे भाविकांच्या आरोग्याशी खेळ !

पुणे – इंद्रायणीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. दुसरा कोणताही उपाय नसल्यामुळे भाविकांना याच पाण्यात अंघोळ करावी लागते. तसेच इंद्रायणी नदी पवित्र म्हणून अनेक भाविक या नदीचे रसायनयुक्त पाणीही पितांना पहायला मिळतात. त्यामुळे भाविकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. प्रशासनाकडूनही याकडे लक्ष दिले जात नसल्याचे पहायला मिळते. तसेच काही ठराविक वेळेला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीच्या मुखवट्यालाही इंद्रायणीच्या पाण्याने अभिषेक केला जातो. प्रदूषित पाण्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. ‘आळंदी देवस्थान कमिटी’ने इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका, सांडपाणी नदीत सोडणारी गावे, राज्य सरकार, केंद्र सरकार यांना पत्रव्यवहारही केला आहे; मात्र संबंधितांवर कोणतीही कारवाई होतांना दिसत नाही. (प्रशासन याविषयी काही कृती का करत नाही ? कि ते भाविकांच्या उद्रेकाची वाट पहात आहे ? – संपादक)

यंदाच्या आषाढी वारीच्या वेळी ४ ते ५ दिवस लाखो भाविक हे आळंदीत मुक्कामी असतील असा अंदाज आहे. गेल्या काही वर्षांमध्ये इंद्रायणीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कारखान्यांचे रसायनमिश्रित पाणी होय. काही ठिकाणच्या गावांचे, तसेच शहरातील सांडपाणी हे कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडण्यात येते. जोपर्यंत इंद्रायणीचे पाणी प्रदूषणमुक्त होत नाही, तोवर आळंदी नगर परिषदेने इंद्रायणी घाटावर दर्शनी भागावार ‘इंद्रायणीचे पाणी पिऊ नका’, असे फलक लावणे आवश्यक आहे.

इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त व्हावी, यासाठी ‘इंद्रायणी सेवा फाऊंडेशन’च्या वतीने १ मेपासून साखळी उपोषण चालू करण्यात आले आहे. जोपर्यंत इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होत नाही, तोपर्यंत हे उपोषण चालू रहाणार, असे उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे.

संपादकीय भूमिका 

धार्मिक महत्त्व असलेल्या नद्याही प्रदूषणग्रस्त होऊ देणार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !