सीमा शुल्क विभागाने पकडलेल्या जहाजावरील साडेतीन सहस्र शेळ्या-मेढ्यांपैकी ३०० शेळ्यांचा मृत्यू

रत्नागिरी – बाणकोट येथे सीमा शुल्क विभागाने पकडलेल्या जहाजावरील अनुमाने साडेतीन सहस्र शेळ्या-मेंढ्यांपैकी ३०० शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. उपासमारी आणि घटसर्प हा आजार झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेळ्यांचा मृत्यू झाला. काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्याने आणि शेळ्यांच्या मालकाने खाद्य पाठवल्याने सांडेलावगण येथे त्यांची देखभाल चालू आहे.

सीमा शुल्क विभागाने काही दिवसांपूर्वी एका जहाजावर कारवाई केली होती. जहाज मालकांकडे जलवाहतुकीचे कोणतेही परवाने नसल्याने अवैध शेळ्या-मेंढ्यांची वाहतूक केल्याप्रकरणी हे जहाज पकडण्यात आले आणि नंतर ते जयगड बंदरात आणण्यात आले होते. तेथे जेव्हा जिल्हा परिषद पशूवैद्यकीय अधिकार्‍यांनी या शेळ्या-मेंढ्यांची तपासणी केली, तेव्हा त्यांची परिस्थिती अतिशय गंभीर होती. बहुतांशी शेळ्या-मेंढ्यांची उपासमार झाली होती. त्यात समुद्रातील प्रवासामुळे अनेक  शेळ्या अशक्त बनल्या होत्या. जहाजाची क्षमता ८०० ते १ सहस्र मेंढ्यांची असतांना साडेतीन हजार शेळया-मेंढ्यांची वाहतूक करण्यात आली होती. त्यामुळे चेंगरून आणि गर्दीमुळे प्राणवायू अल्प यांमुळे अनेक या शेळ्या आजारी पडल्या. जहाजातच ६० शेळ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचे शवविच्छेदन करून अहवाल तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आला. त्यानंतर  प्रतिदिन १० ते १५ शेळ्या-मेंढ्या मरत होत्या. आतापर्यंत सुमारे ३०० शेळ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पशूवैद्यकीय अधिकारी जगदाळे यांनी दिली.

काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्याने आणि मूळ मालकाने काही प्रमाणात खाद्य पाठवल्याने आता या शेळ्यांची देखभाल होत आहे; परंतु तपासणीचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे. त्यामध्ये या पशूंना घटसर्प झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. आता या सर्व पशूंचे लसीकरण केले जात आहे. औषधोपचार आणि देखभाल केली जात असल्याने शेळ्या-मेंढ्यांचे मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी जगदाळे यांनी दिली.