बारसू परिसरातील तेलशुद्धीकरण प्रकल्पाला विरोध !
रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील बारसू परिसरात तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलन पुन्हा जोर धरणार याची चिन्हे दिसू लागली आहेत. ५ मे या दिवशी बारसूच्या सड्यावर आंदोलक जमायला प्रारंभ झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने बारसू-सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष नेते अमोल बोळे आणि त्यांची पत्नी मानसी अमोल बोळे यांच्यासह एकूण ११ जणांना अटक केली आहे.
अमोल बोळे यांचा या प्रकल्पाला विरोध असून गेले काही दिवस काही पदाधिकार्यांवर घालण्यात आलेल्या जिल्हाबंदीमुळे अमोल बोळे हे बारसू परिसरात आले नव्हते; मात्र ४ मे या दिवशी न्यायालयाने जिल्हा बंदी उठवल्यानंतर ते पुन्हा गावात आले होते. त्यांच्यासमवेत विजय आरेकर, रमेश गोर्ले, अक्षय बोळे, आशिष बोळे, स्नेहल गोर्ले, मानसी बोळे, अमित चव्हाण यांनाही पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
मागील आठवड्यात या प्रकल्पासाठी मातीचे सर्वेक्षण ड्रिलिंगद्वारे चालू करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाकडून प्रकल्पाला होत असलेला विरोध न्यून व्हावा, तसेच विरोधकांचे गैरसमज दूर व्हावेत यासाठी बैठका आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते; मात्र प्रकल्प विरोधकांचा विरोध अद्यापही कायम असल्याचे दिसत आहे. अशातच ६ मे या दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बारसू येथील ग्रामस्थांना भेटणार आहेत.