शिर्डी येथे शिफारशीविना ‘काऊंटर’वरून आरती पास वितरित करण्‍याचा निर्णय !

शिर्डी (जिल्‍हा नगर) – झटपट दर्शन आणि आरती पास काढून देण्‍याच्‍या नावाखाली शिर्डीत अनेकदा साईभक्‍तांच्‍या फसवणुकीचे प्रकार घडतात. बरेचदा काही सुरक्षारक्षकांना हाताशी धरून पैसे कमावण्‍याचा प्रकार अनेकांनी चालू केल्‍याचा आरोप ग्रामस्‍थांनी केला आहे, तर आरती पास घेण्‍यासाठी लागणारी शिफारस यांमुळे भक्‍तांची लूट होत असल्‍याचेही ग्रामस्‍थांनी सांगितले. ही सगळी सूत्रे ग्रामस्‍थांनी साईसंस्‍थानपुढे मांडली. त्‍यानंतर आता साईबाबांच्‍या आरतीसाठी शिफारस चालणार नाही, असा निर्णय ४ मे या दिवशी ग्रामस्‍थ आणि शिर्डी मंदिर प्रशासनाच्‍या बैठकीत शिर्डी संस्‍थानने घेतला आहे. आता ‘काऊंटरवर’च आरती पास मिळणार असल्‍याचे संस्‍थानने घोषित केले आहे. त्‍यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी फसवणूक आणि ‘व्‍हीआयपी’ गर्दी नियंत्रणात आणणे शक्‍य होणार आहे.

विशेष म्‍हणजे आता शिर्डीतील ग्रामस्‍थांना केवळ आधारकार्ड दाखवून दर्शनासाठी प्रवेश मिळणार आहे. ग्रामस्‍थांसह अन्‍य कुणालाही सोडले जाणार नाही, असेही संस्‍थानने स्‍पष्‍ट केले आहे. यासह सुरक्षारक्षक आणि इतर कर्मचारी यांच्‍याकडून कुठलाही अपप्रकार घडू नये, यासाठी संस्‍थानच्‍या कर्मचार्‍यांना भ्रमणभाष आणण्‍यास बंदी घालण्‍यात आली आहे.