तपासयंत्रणांनी जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला आहे ! – लेखक डॉ. अमित थडानी

नास्तिकतावाद्यांच्या हत्या आणि भरकटलेले अन्वेषण यांवर प्रकाशझोत टाकणार्‍या ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ पुस्तकाचे प्रकाशन !

पुस्तक प्रकाशन करतांना डावीकडून इतिहासतज्ञ श्री. रतन शारदा, लेखक डॉ. अमित थडानी आणि अभिनेत्री केतकी चितळे

मुंबई, २९ एप्रिल (वार्ता.) – ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ हे पुस्तक लिहिण्यासाठी ८०० हून अधिक संदर्भ पडताळले आणि १० सहस्रांहून अधिक पानांचे आरोपपत्र वाचले. नास्तिकतावाद्यांपैकी एकाच्या हत्येमध्ये दर २-३ वर्षांनी काही लोकांना पकडण्यात आले आणि तेच खुनी म्हणून सांगितले गेले. यात ५ वेळा वेगवेगळ्या लोकांची नावे घेण्यात आली. खुनी पालटले गेले, शस्त्रे पालटली गेली, शस्त्रांच्या जागा पालटल्या गेल्या. ‘फॉरेन्सिक लॅब’चे अहवाल वेगवेगळे होते. ठाणे खाडीत शस्त्र शोधण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. हा विनोद नाही, हे सर्व आरोपपत्रात आहे. ‘मिडिया ट्रायल’चा मोठा दुष्परिणाम या अन्वेषणावर झाला. निष्पाप लोकांना अनेक वर्षे छळ करून कारागृहात डांबून ठेवण्यात आले आहे. गौरी लंकेश खटल्यातही संशयितांची वेगवेगळी हास्यास्पद छायाचित्रे अधिक संख्येने काढण्यात आली. पानसरे खटल्यातही साक्षीदारांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. खोट्या कथा रचल्या गेल्या; तपासातील अशा अनेक सत्य गोष्टी या पुस्तकात आहेत. यावरून ‘तपासयंत्रणांनी जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला आहे’, असेच वाटते. मी या पुस्तकातून तपासाचे सत्य सांगितले आहे. मी सत्याच्या बाजूने आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध डॉ. अमित थडानी यांनी केले. शीव येथील षण्मुखानंद सभागृहात २९ एप्रिल या दिवशी डॉ. अमित थडानी यांनी लिहिलेल्या ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून इतिहासतज्ञ आणि लेखक श्री. रतन शारदा आणि विशेष पाहुण्या म्हणून अभिनेत्री केतकी चितळे उपस्थित होत्या. पुरोगाम्यांच्या हत्यांच्या खटल्यांमध्ये हिंदुत्वनिष्ठांची बाजू मांडणारे हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर हेही या वेळी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले.

या वेळी डॉ. अमित थडानी यांनी संगणकीय प्रणालीद्वारे सादरीकरण (पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन) करून पुस्तकातील तथ्यांविषयी मनोगत व्यक्त केले. अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी या खटल्यांतील कायदेविषयक तथ्यांवर भाष्य केले. मान्यवरांच्या मनोगतानंतर डॉ. अमित थडानी यांच्या पत्नी सौ. अंजना थडानी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

अधिवक्ता, डॉक्टर, पत्रकार, लेखक, उद्योजक आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते. या वेळी अनेकांनी या पुस्तकाची खरेदी केली.

‘अ‍ॅमेझॉन’च्या पुढील लिंकवरून पुस्तक खरेदी करा ! : www.amazon.in/dp/817062357X?ref=myi_title_dp