पालघर साधू हत्याकांडाचे अन्वेषण सीबीआयकडे !

राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती !

नवी देहली – महाराष्ट्रातील पालघर येथील गडचिंचले गावात १६ एप्रिल २०२० या दिवशी जमावाकडून झालेल्या साधूंच्या निर्घृण हत्या प्रकरणाचे अन्वेषण केंद्रीय गुन्हे अन्वेेषण विभाग (‘सीबीआय’कडे) सोपवले जाईल, अशी माहिती महाराष्ट्र सरकारकडून सर्वोेच्च न्यायालयाला देण्यात आली आहे. कोरोनाकाळात दळणवळण बंदी असतांना २ साधू आणि त्यांना घेऊन जाणारे वाहनचालक यांची जमावाकडून हत्या करण्यात आली होती.


कल्पवृक्ष गिरी उपाख्य चिकणे महाराज आणि सुशील गिरी महाराज हे २ साधू, तसेच वाहनचालक नीलेश तेलगडे हे जमावाच्या आक्रमणाला बळी पडले होते. साधूंच्या हत्याकांडानंतर देशातील संत संतप्त झाले होते. या प्रकरणाचे अन्वेषण सीबीआयकडे देण्यास सरकारची काहीही हरकत नाही’, असे यापूर्वी राज्य सरकारकडून न्यायालयात सांगण्यात आले होते. ही घटना घडल्याच्या ३ वर्षांनंतर आता या प्रकरणाचे अन्वेषण सीबीआयकडे वर्ग होणार आहे.