आणखी २ दिवस गारपिटीचा मारा होणार !

विदर्भासह उर्वरित राज्‍यात ‘यलो अलर्ट’ !

नाशिक – राज्‍यात विदर्भात २६ एप्रिलपासून २ दिवस काही ठिकाणी पावसाचा यलो आणि ऑरेंज, तर नाशिक जिल्‍ह्यासह मराठवाडा, मध्‍य महाराष्‍ट्रात ‘यलो अलर्ट’ मुंबई आणि नागपूर वेधशाळेने घोषित केला आहे. विदर्भात वार्‍याचा वेग ताशी ४० ते ५० कि.मी., तर उर्वरित राज्‍यात ३० ते ४० कि.मी. राहील. मध्‍यप्रदेश आणि सभोवतालच्‍या परिसरावर ९०० मीटर उंचीवर गोलाकार वार्‍यांची स्‍थिती असून ती महाराष्‍ट्रापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत आहे. त्‍यामुळे उत्तर महाराष्‍ट्रापासून ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत अल्‍प दाबाचा पट्टा आणि वारा खंडितता प्रणाली कायम असल्‍याने पावसाचे वातावरण आहे.

नाशिक जिल्‍ह्यात येत्‍या २ दिवसांत अवकाळी पावसासह सोसाट्याचा वारा आणि गारपीट होणार असल्‍याचा अंदाज इगतपुरी भात संशोधन केंद्र आणि जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन विभागाने दिला आहे. अर्धापूर तालुक्‍यात वादळी गारपिटीने पपईची बाग आडवी झाली. नांदेड, हिंगोली, परभणी, बीड आणि जालना जिल्‍ह्यांत २५ एप्रिल या दिवशी गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. नांदेड जिल्‍ह्यातील कंधार आणि किनवट तालुक्‍यात वीज पडून ५ जनावरे दगावली. जवळा येथे घरावरील पत्रे उडाल्‍याने ८ वर्षांचा मुलगा घायाळ झाला. हिंगोली जिल्‍ह्यात कळमनुरी तालुक्‍यातील काही गावांत २० मिनिटांच्‍या वादळी वार्‍यामुळे सहस्रो केळीची झाडे आडवी झाली.