कोल्हापूर, २४ एप्रिल (वार्ता.) – वर्ष २०२४ लोकसभा निवडणुकांची सिद्धता चालू झाली असून मतदारसूची दुरुस्त करणे, अद्ययावत् करणे, नवमतदारांची नोंदणी करणे या प्रक्रियांना जोर धरला आहे. मतदार ओळखपत्र आधारकार्डला जोडण्याच्या मोहिमेत कोल्हापूर जिल्हा राज्यात पहिल्या १० मध्ये आहे. जिल्ह्यातील ३१ लाख ४८ सहस्र १९४ मतदारांपैकी २० लाख ४६ सहस्र ३२३ मतदारांचे ओळखपत्र आधारकार्डला जोडलेले असूून ही आकडेवारी ६५ टक्के आहे. ही मोहीम निरंतर चालू असून मतदारांना जवळच्या मतदानकेंद्रावर जाऊन याचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवडणूक शाखेने केले आहे.
जिल्ह्यासाठी १ सहस्र ८५० ‘व्ही.व्ही.पॅट’ यंत्रे प्राप्त झाली आहेत. मतदारांनी कुणाला मतदान केले ? याची कागदाची प्रत यंत्राद्वारे उपलब्ध होते. ती निवडणुकीनंतर ठराविक काळ संरक्षित केली जाते. या सुविधेमुळे ‘मतदान एका उमेदवारास केले आणि प्रत्यक्षात मतदान वेगळ्यास उमेदवारास झाले’, असा आरोप कुणी केल्यास त्याला हे यंत्र आणि त्यातील कागदाची प्रत हा पुरावा ग्राह्म धरला जाऊ शकतो. मात्र ही प्रत निवडणूक शाखेकडेच संरक्षित करून ठेवण्यात येते.