ज्येष्ठ निरुपणकार पू. डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे बनावट पत्र प्रसारित करून शासनाच्या विरोधात प्रसार !

पू. डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी

मुंबई – ‘महाराष्ट्र भूषण’ ज्येष्ठ निरुपणकार पू. डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे सामाजिक माध्यमांवर बनावट पत्र प्रसारित करून त्याद्वारे राज्यातील शिवसेना-भाजप युती शासनाच्या विरोधात प्रसार केला जात आहे. पू. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून हे पत्र बनावट असल्याचे सांगण्यात आले असून रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणी अन्वेषण चालू आहे.

महाराष्ट्र भूषण पू. डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे २२ एप्रिल या दिवशी हे बनावट पत्र प्रसारित करण्यात आले आहे. यामध्ये शासनाने दिलेला पुरस्कार परत करणार असल्याचे नमूद केले आहे. ‘माझ्या अनुयायांचा मतांसाठी वापर केला गेला. माझ्या साधकांसाठी मंडप टाकला नाही. झालेल्या घटनेचे पूर्ण दायित्व घेऊन मी श्री सेवकांची क्षमा मागतो. माझ्या सर्व श्री सेवकांना मी आवाहन करतो की, यापुढे भाजप आणि शिंदे गटाला मतदान करू नका’, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. पू. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या प्रवक्त्यांनी अशा प्रकारचे कुठलेही पत्र पू. डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी प्रसारित केलेले नाही, असे स्पष्ट केले आहे. पू. डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सचिव संदीप पाटील यांनी हे पत्र बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. कुणीतरी खोडसाळपणा करून पू. डॉ. अप्पासाहेब यांच्या यापूर्वीच्या पत्राचा उपयोग करून त्यातील मूळ लिखाण काढून त्यात फेरफार करून हे बनावट पत्र सिद्ध करण्यात आले असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले आहे. (पोलिसांनी संबंधितांचा लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. – संपादक) रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या प्रकरणाची पोलिसांकडून गंभीर नोंद करण्यात आली असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित भाविकांपैकी १४ जणांचा मृत्यू झाला. भाविकांचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचे प्राथमिक कारण पुढे आले असून या प्रकरणाचे अन्वेषण करण्यासाठी राज्यशासनाने समिती गठीत केली आहे.