सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यातील एका मद्यपी शिक्षकाचे कृत्य उघड करणार्‍या पत्रकाराला शिक्षकाची धमकी

मद्यपी शिक्षकाला निलंबित करण्याची दोडामार्ग तालुका पत्रकार समितीची मागणी

(प्रतिकात्मक चित्र)

दोडामार्ग – तालुक्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील मद्यपी शिक्षकाने शाळेच्या वेळेत मद्यपान करून ते रस्त्यावरच झोपले. याविषयीचे वृत्त एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. हे वृत्त प्रसिद्ध केल्याचा राग येऊन त्या मद्यपी शिक्षकाने त्या पत्रकारास धमकी दिली आहे. याविषयी तालुका पत्रकार समितीने नोंद घेऊन संबंधित शिक्षकाची वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला असून त्या शिक्षकाच्या निलंबनाची मागणी केली आहे. (जनाची नाही, तर निदान मनाची तरी लाज अशा शिक्षकांनी बाळगायला हवी. अशा शिक्षकांमुळे संपूर्ण शिक्षण विभागाकडेच संशयाने पाहिले जाऊ शकते ! – संपादक)

दोडामार्ग तालुक्यातील हा शिक्षक प्राथमिक शाळेत कार्यरत असून एक दिवस शाळेत जाण्यासाठी निघाला; मात्र शाळेत न जाता मद्यपान करून रस्त्यावरच झोपला होता. या घटनेची माहिती वार्‍यासारखी तालुकाभर पसरली होती. शिक्षकाच्या या कृत्याने पालकांनी संताप व्यक्त केला होता.

हा शिक्षक उद्धट वागत असल्याने त्याला यापूर्वी पालक आणि ग्रामस्थ यांनी  शाळेत कोंडून ठेवले होते. त्या वेळी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मध्यस्थीने त्याला सोडण्यात आल्याचे समजते. (अशा शिक्षकावर त्याच वेळी कठोर कायदेशीर कारवाई केली असती, तर त्याने मद्यपान करण्याचे आणि पत्रकाराला धमकी देण्याचे धाडस केले नसते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

शिक्षकीपेशाला काळीमा फासणारी घटना ! असे शिक्षक विद्यार्थी आणि समाज यांच्यासमोर कोणता आदर्श ठेवणार ?