‘दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा ‘विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वानुसार काही विकारांवर दिलेले नामजप’, हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यानुसार ठाणे येथील सत्संगातील जिज्ञासू साधिका सौ. संगीता सतीश वालावलकर (वय ६१ वर्षे) यांनी पित्ताचा त्रास दूर होण्यासाठी असलेला नामजप केल्यावर त्यांना आलेली अनुभूती पुढे दिली आहे.
१. पाय घसरून पडल्यामुळे पायाचा अस्थीभंग होणे, आधुनिक अस्थीरोग तज्ञांनी दिलेल्या गोळ्यांनी झालेले पित्त पित्तशामक गोळ्या घेऊनही न्यून न होणे
‘१८.१२.२०२२ या दिवशी एका सत्संगाला जातांना मी पाय घसरून पडले. त्याकडे मी ४ दिवस दुर्लक्ष केले. त्यानंतर पायाचा ‘एक्स्-रे’ काढल्यावर ‘पायाचा अस्थीभंग झाला आहे’, असे आधुनिक अस्थीरोग तज्ञांनी सांगितले. त्यांनी माझ्या पायाला ‘प्लास्टर’ घालून मला औषधे (गोळ्या) दिली. त्या गोळ्यांमुळे मला पुष्कळ पित्त झाले. दिवसाला २ पित्तशामक गोळ्या घेऊनही पित्त न्यून होत नव्हते. त्यामुळे मला जेवणही जात नव्हते.
२. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सद्गुरु डॉ. गाडगीळ यांच्या ‘विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वानुसार काही विकारांवर दिलेले नामजप’ लेखाचे कात्रण जपून ठेवूनही ते न सापडणे
११.४.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा ‘विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वानुसार काही विकारांवर दिलेले नामजप’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्याचे कात्रण मी जपून ठेवले होते; पण पायाला घातलेल्या ‘प्लास्टर’मुळे मी ते कात्रण ठेवलेल्या ठिकाणाहून काढू शकत नव्हते आणि घरातील कुणालाही ते कात्रण सापडत नव्हते.
३. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेल्या एका साधिकेच्या अनुभूतीतून पित्ताच्या विकारावरील नामजप मिळणे
२९.१२.२०२२ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये एका साधिकेला पित्ताच्या विकारावरील नामजपाने आलेली अनुभूती प्रसिद्ध झाली होती. त्यात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी पित्ताचा विकार दूर होण्यासाठी सांगितलेला ‘श्री गणेशाय नमः – श्री राम जय राम जय जय राम – श्री हनुमते नमः – ॐ नमः शिवाय – ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप दिला होता.
४. पित्त न्यून होण्यासाठी असलेला नामजप मिळाल्यावर त्वरित तो चालू करणे, नामजप केल्यावर पित्ताचा त्रास न्यून होत जाऊन थांबणे
पित्त न्यून होण्यासाठी असलेला नामजप मिळाल्यावर मी लगेच ३० मिनिटे तो नामजप केला. मी नामजप करायला आरंभ केल्यापासून माझी डोकेदुखी, छातीतील जळजळ आणि पोटातील मळमळ थांबली. उलटी होण्याची भावनाही थांबली. त्यामुळे माझा या नामजपावरील विश्वास वाढला. संध्याकाळी पुन्हा मी ३० मिनिटे हा नामजप केला. त्यामुळे पित्ताच्या गोळ्या बंद झाल्या आणि मला जेवणही जाऊ लागले.
दुसर्या दिवशी मला पित्ताचा त्रास होत नव्हता, तरीही मी नामजप करून भोजन केले. मी आता प्रतिदिन हा नामजप करते.
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या अमूल्य नामजपरूपी संजीवनीमुळे ‘सर्वांचे त्रास दूर व्हावेत’, ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे. माझ्याकडून ही अनुभूती लिहून घेतल्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. संगीता सतीश वालावलकर (वय ६१ वर्षे), लोकमान्यनगर, ठाणे. (५.१.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |