सावरकरांचे विचार तळागाळांत पोचवून सकारात्मक पद्धतीने काँग्रेसला विरोध करणार ! – अधिवक्ता दीपक पटवर्धन, भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष

रत्नागिरी जिल्ह्यात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रे’चे आयोजन !

रत्नागिरी, १ एप्रिल (वार्ता.)- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना टोकाचा विरोध करणारी काँग्रेस, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान करणारे राहुल गांधी यांच्यापर्यंत सावरकरांचे विचार पोचवून सकारात्मक पद्धतीने विरोध करण्याचा निर्णय भाजप-शिवसेना युतीने घेतला आहे. त्यासाठी राज्यभरात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात देवरुख येथे ४ एप्रिल, राजापूर येथे ५ एप्रिल आणि रत्नागिरी येथे ६ एप्रिल या ३ ठिकाणी ही यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अधिवक्ता दीपक पटवर्धन यांनी दिली.

अधिवक्ता पटवर्धन पुढे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सामाजिक समरसतेचा पाया रत्नागिरीत असतांना घातला. येथील कारागृहातील शिक्षा आणि स्थानबद्धता यांच्या वर्षांची नोंद इतिहासाने घेतली असून त्यांचे रत्नागिरीशी नाते वेगळेच होते. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात निघणार्‍या गौरवयात्रेला विशेष महत्त्व आहे.

विशेष कारागृहातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीतील छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रेला प्रारंभ होणार असून जेलनाक्यामार्गे ही यात्रा स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात पोचणार आहे. या ठिकाणी सावरकरप्रेमी आणि प्रमुख मान्यवर स्वत:चे मनोगत व्यक्त करणार आहेत. या गौरवयात्रेमध्ये जिल्ह्यातील सर्व सावरकरप्रेमींनी सहभागी व्हावे.’’