‘केडीसीसी’ बँकेतील उद्धट कर्मचार्‍यांनी त्‍यांचे वागणे पालटले नाही, तर धडा शिकवू !

भाजपचे कोल्‍हापूर जिल्‍हाध्‍यक्ष राहुल चिकोडे यांची चेतावणी

‘केडीसीसी’ बँकेतील कर्मचार्‍यांना जाब विचारतांना भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष राहुल चिकोडे, तसेच अन्‍य

कोल्‍हापूर – निवृत्ती चौक या ठिकाणी असणार्‍या ‘केडीसीसी’ (कोल्‍हापूर जिल्‍हा मध्‍यवर्ती) बँकेमधील कर्मचारी सेवानिवृत्त वयोवृद्ध नागरिकांना अपमानकारक वागणूक देत असल्‍याच्‍या, तसेच बँकेतील सुविधांचा लाभ देत नसल्‍याच्‍या तक्रारी भाजपकडे आल्‍या होत्‍या. या तक्रारींची नोंद घेत भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष राहुल चिकोडे यांच्‍या नेतृत्‍वाखाली शिष्‍टमंडळाने ‘केडीसीसी’ बँकेच्‍या शिवाजी पेठ शाखेमध्‍ये जाऊन उद्धट कर्मचारी आणि अधिकारी यांना धारेवर धरले. या वेळी राहुल चिकोडे यांनी तीव्र शब्‍दांत बँकेतील कर्मचार्‍यांची कानउघाडणी करत ‘केडीसीसी’ बँकेतील उद्धट कर्मचार्‍यांनी त्‍यांचे वागणे पालटले नाही, तर धडा शिकवू’, अशी चेतावणी दिली.

वयोवृद्ध निवृत्तधारकांनी बँकेचे ‘पासबुक’ भरून देण्‍यास टाळाटाळ करणे आणि पुन्‍हा बोलावणे, वृद्धांना शाखेमध्‍ये थांबू न देणे, बँकेमध्‍ये चप्‍पल बाहेर काढायला लावणे आदी समस्‍यांचा पाढा वाचत राहुल चिकाडे यांनी ज्‍येष्‍ठ नागरिकांना होणार्‍या त्रासाची कर्मचार्‍यांना जाणीव करून दिली. या प्रसंगी जिल्‍हा सरचिटणीस दिलीप मेत्राणी, गिरीश साळुंखे, महिला जिल्‍हाध्‍यक्ष गायत्री राऊत, लोहार, संतोष माळी यांच्‍यासह तक्रारदार वयोवृद्ध नागरिक उपस्‍थित होते.

संपादकीय भूमिका

बँकेतील कर्मचारी आणि अधिकारी उद्धटपणे वागतात, तर त्‍यांच्‍यावर कुणाचा अंकुश कसा नाही ?