खेड शिवापूर टोलनाक्‍यावर २८ मार्चपासून स्‍थानिकांना पुन्‍हा पथकर माफी !

सर्वपक्षीय आणि कृती समितीच्‍या आक्रमक भूमिकेपुढे पथकर प्रशासन नरमले

शिवापूर पथकर नाका हटाव कृती समितीचे सदस्‍य

भोर (जिल्‍हा पुणे) – ‘शिवापूर पथकरनाका हटाव कृती समिती’ने शिवापूर पथकरनाका स्‍थलांतरित करण्‍यासाठी २ एप्रिल या दिवशी बंद पुकारला होता; परंतु जिल्‍हाधिकार्‍यांसमवेत झालेल्‍या बैठकीनंतर काही महत्त्वाचे निर्णय घेण्‍यात आले. स्‍थानिक नागरिकांना ओळखपत्र दाखवल्‍यानंतर त्‍यांना पथकर माफी होणार आहे. त्‍यामुळे २ एप्रिलला करण्‍यात येणारे आंदोलन तात्‍पुरते स्‍थगित करण्‍यात आले आहे, अशी माहिती भोर विधानसभा मतदारसंघांचे आमदार संग्राम थोपटे आणि कृती समितीचे निमंत्रक माऊली दारवटर यांनी दिली.

जिल्‍हाधिकारी राजेश देशमुख, महामार्ग प्रशासनाचे अधिकारी, आमदार संग्राम थोपटे आणि शिवापूर पथकर नाका हटाव कृती समितीचे सदस्‍य यांच्‍यात बैठक पार पडली. बैठकीच्‍या आरंभीच शिवापूर पथकरनाक्‍यामुळे भोर, वेल्‍हा, हवेली या तालुक्‍यांमधील नागरिकांना होणार्‍या त्रासाविषयी कृती समितीने आक्रमकपणे भूमिका मांडली. या वेळी कृती समितीच्‍या आक्रमक भूमिकेपुढे पथकर प्रशासनाने शेवटी माघार घेत पथकर माफीचा निर्णय घोषित केला आहे; मात्र पथकरनाका स्‍थलांतराविषयी राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लवकरात लवकर निर्णय न घेतल्‍यास कृती समिती कोणत्‍याही क्षणी आंदोलन करण्‍यास सिद्ध आहे, अशी भूमिका शिवापूर पथकरनाका हटाव कृती समितीने मांडली आहे.