#Exclusive : राजापूर (रत्नागिरी) बसस्थानकातील पडक्या उपाहारगृहामुळे कर्मचारी आणि प्रवासी यांचा जीव दावणीला बांधलेला !

एस्.टी. महामंडळाच्या ‘बसस्थानक स्वच्छता मोहिमे’चे खरे स्वरूप उघड करणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची वृत्तमाला !

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केवळ घोषणा, प्रत्यक्षात बहुतांश बसस्थानकांची दुरवस्था !

राज्य परिवहन मंडळाने यंदाच्या ‘अमृत महोत्सवी’ वर्षात ‘बसस्थानक स्वच्छता मोहीम’ हाती घेऊन कार्यक्रमही निश्‍चित केला आहे. या मोहिमेला साहाय्य व्हावे, या हेतूने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींना लक्षात आलेली विविध शहारांतील बसस्थानकांची दुःस्थिती येथे मांडत आहोत. बसस्थानकांची ही विदारक स्थिती पालटली आणि तिथे मूलभूत सोयी उपलब्ध झाल्या, तर ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे परिवहन मंडळाचे ब्रीदवाक्य अधिक खरे ठरेल. ‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे’, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. या वृत्तमालिकेच्या माध्यमातून एस्.टी.च्या पुनरुत्थानासाठी चळवळ उभी रहावी, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.

प्रतिनिधी : श्री. विनोद गादीकर

राजापूर, २७ मार्च (वार्ता.) – भिंतीच्या विटा ढासळेल्या, तसेच अक्षरश: बांधकाम कोसळायला आलेल्या खोलीत राजापूर बसस्थानकामध्ये राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी आणि प्रवासी यांच्यासाठी उपाहारगृह चालवले जाते. ‘भिंती कधीही पडतील’, अशा स्थितीत असलेल्या या खोलीत उपाहारगृह चालवून एस्.टी. महामंडळाने कर्मचारी आणि प्रवासी यांचा जीव अक्षरश: दावणीला बांधला आहे.

जीर्ण भिंती असलेले उपहारगृह

१. या उपाहारगृहात प्रवासी आणि एस्.टी.चे कर्मचारी यांचा वावर नेहमी असतो. दुर्दैवाने येथे एखादी दुर्घटना घडल्यास दोषींना कदाचित् शिक्षा होईलही; परंतु ‘कुणाच्या जिवावर बेतल्यास उत्तरदायी कोण ?’, असा प्रश्न उपस्थित होतो.

उपहारगृहाची बाहेरच्या बाजूने भिंतीला झालेली दुरावस्था

२. ‘अनेक दिवस बंद असलेल्या पडक्या घराची जशी अवस्था असते’, तशी राजापूर बसस्थानकामधील उपाहारगृहाची अवस्था झाली आहे.

उपहारगृहाच्या बाहेरच्या भिंतीवर ऊगवलेले गवत
उपहारगृहाच्या भिंतींना गेलेले तडे

३. उपाहारगृहाचे छत गळत असल्यामुळे त्याला प्लास्टिक लावण्यात आले आहे. त्याच्या भिंती अतिशय जीर्ण झाल्या असून शेवाळ्याने त्या काळवंडल्या आहेत. पडक्या घराप्रमाणे उपाहारगृहाच्या भिंतींवर बाहेरून गवत उगवले आहे.

अतिशय दुरावस्था असलेले शौचालय

४. शौचालयाची स्थिती तर अतिशय विदारक आहे. भिंतीचे बांधकाम पडले आहे. शौचालय आणि प्रसाधनगृह येथील टाईल्स अतिशय घाणेरड्या झाल्या आहेत. शौचालयात पाण्याचीही व्यवस्था नाही. भिंतींचे प्लास्टर निघाले आहे.

बसस्थानकावरील अस्वच्छ प्रसाधनगृहे

५. बसस्थानकाच्या इमारतीची अवस्थाही दयनीय आहे. काही ठिकाणी बांधकाम पडले आहे. भिंती काळवंडल्या असून त्यांवर शेवाळे साचले आहे.

बसस्थानकाच्या इमारतीच्या छताला असलेली कोळीष्टके

६. बसस्थानकावर वाहक-चालक यांच्यासाठी असलेल्या विश्रामगृहाच्या भिंतींमधून पावसाळ्यात पाणी झिरपते. यामुळे भिंतींचे प्लास्टर निघत आहे. एस्.टी.साठी दिवस-रात्र राबणार्‍या कर्मचार्‍यांच्या हिताकडे मात्र एस्.टी. महामंडळाकडून दुर्लक्ष होत आहे.

बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे पाठवा !

आपापल्या भागांतील बसस्थानकांची अस्वच्छता आणि दुरवस्था यांविषयी छायाचित्रांसह माहिती एस्.टी. महामंडळाच्या ‘@msrtcofficial’ या ‘ट्वीटर हँडल’वर पाठवा आणि ही माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’साठी ९२२५६३९१७० या ‘व्हॉट्सॲप’ क्रमांकावरही पाठवा. बसस्थानकांची दयनीय स्थिती दाखवून स्वच्छता मोहिमेसाठी एस्.टी.ला सहकार्य करा.