हणजूण (गोवा) येथे पर्यटकाला मारहाण : कामुर्ली येथील दोघांना अटक

(प्रतिकात्मक चित्र)

म्हापसा, १६ मार्च (वार्ता.) – हणजूण येथे रस्त्यावरून चारचाकीने जातांना मोटरसायकलला ओलांडून गेल्याच्या (ओव्हरटेक केल्याच्या) कारणावरून मोटरसायकलने जाणार्‍या कामुर्ली येथील दोघांनी महाराष्ट्रातील एका पर्यटकाला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी मारहाण करणारे कामुर्ली येथील विराज पार्सेकर (२५ वर्षे) आणि सिद्धांत खोर्जुवेकर (२९ वर्षे) या दोघांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

यासंबंधी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे दोघे संशयित हणजूण येथे मोटरसायकलने जात असतांना कल्याण मुंबई येथे रहाणार्‍या आणि गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या ओंकार उपवने यांनी चारचाकीतून जातांना ‘ओव्हरटेक’ केले. त्यामुळे या दोघा संशयितांनी रागाने ओंकार यांची गाडी अडवली आणि त्यांच्यावर आक्रमण करून त्यांना अमानुषपणे मारहाण केली. संशयितांनी दगड आणि सिमेंटच्या विटा यांनी ओंकार यांच्या डोक्यावर आघात करून त्यांना घायाळ केले, तसेच त्यांच्या गाडीचीही हानी केली. घायाळ झालेले ओंकार उपवने यांना म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. या प्रकरणातील संशयित विराज पार्सेकर आणि सिद्धांत खोर्जुवेकर यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

१२ मार्चला हणजूण येथे उत्तर भारतातील शर्मा आडनावाच्या कुटुंबातील एकावर तलवार आणि चाकू यांच्या साहाय्याने आक्रमण करण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

अशा घटना गोव्याची जगभरात अपकीर्ती करतात. यातून समाजाला साधना शिकवणे किती अपरिहार्य आहे, ते लक्षात येते !