दोषी पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

  • रामनगर (जिल्‍हा नगर) येथील धर्मांधांनी हिंदूंवर केलेल्‍या अत्‍याचारांचे प्रकरण

  • धर्मांधाच्‍या अटकपूर्व जामिनाच्‍या विरोधात अपील करणार !

मुंबई, १६ मार्च (वार्ता.) – गेल्‍या अनेक वर्षांपासून नगर शहरातील रामनगर परिसरातील हिंदु समाजातील लोकांवर धर्मांध अत्‍याचार करत आहेत. हिंदूंच्‍या घरात घुसून हिंदु तरुणी आणि महिला यांचा विनयभंग करणे, तसेच देवतांच्‍या चित्रांची विटंबना करणे, असे प्रकार करण्‍यात येत आहेत. अफझल शेख याच्‍या नेतृत्‍वाखाली अन्‍य धर्मांध असे प्रकार करत आहेत. हिंदूंवरील अत्‍याचारांच्‍या घटना घडूनही पोलिसांनी धर्मांध अफझल शेख याच्‍यासह इतर धर्मांधांवर कठोर कारवाई केलेली नाही. त्‍यामुळे या धर्मांधांना अटक करून त्‍यांच्‍यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत १६ मार्च या दिवशी लक्षवेधी सूचना मांडतांना केली.

या वेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘या प्रकरणाची फेरचौकशी करून धर्मांध अफझल शेख याच्‍या अटकपूर्व जामिनाच्‍या विरोधात न्‍यायालयात अपील केले जाईल, तसेच या प्रकरणी दोषी स्‍थानिक पोलीस अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्‍यात येईल’, असे आश्‍वासन दिले.

रामनगर येथील हिंदूंवरील अत्‍याचारांचा नितेश राणे यांनी वाचला पाढा !

नितेश राणे

रामनगर येथील हिंदूंवरील अत्‍याचारांविषयी अधिक माहिती देतांना आमदार नितेश राणे म्‍हणाले, ‘‘छत्रपती संभाजीनगरचे ‘स्‍टेटस’ ठेवले म्‍हणून रामनगर येथील अशोक लोंढे यांना धर्मांधांनी मारहाण केली. रामनगर येथील अफझल यासीर शेख याने हिंदुत्‍वनिष्‍ठ कुणाल भंडारी, राजू भोईटे यांच्‍यासह हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांतील हिंदुत्‍ववाद्यांना लक्ष्य करून त्‍यांना रॉडने मारहाण केली, तसेच त्‍यानेच इतर धर्मांधांना हाताशी धरून रोहित जगताप याच्‍या घरातील हिंदु तरुणी आणि महिला यांचा विनयभंग केला. अफझल शेख त्‍याच्‍या घरात पाकिस्‍तानमधील वाहिन्‍यांचे कार्यक्रम पहातो. कुठलीही घटना घडल्‍यावर अफझल हा सर्व धर्मांधांना एकत्र करून पोलिसांवर दबाव आणतो. तो ‘लव्‍ह जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’ करून त्‍यासाठी मुसलमान तरुणांना निधीही पुरवत आहे. अफझल शेख याचा भाऊ मुदस्‍सर हा रामनगर भागाचा नगरसेवक असून त्‍याच्‍याच वडिलांनी शिवजयंतीच्‍या दिवशी शेवगाव भागातील हिंदु कहार समाजाच्‍या मुलाला घरावर भगवे झेंडे लावल्‍याच्‍या कारणावरून मारहाण केली होती. हिंदूंवर अनन्‍वित अत्‍याचार करूनही अफझल याला अटक करत नाहीत. धर्मांधांवर कारवाई न करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी.’’ (हे वाचून रामनगर भारतात आहे कि पाकिस्‍तानात ?, असा प्रश्‍न कुणाला पडल्‍याविना रहाणार नाही ! – संपादक)

रामनगर येथील हिंदूंवरील अत्‍याचारांच्‍या घटनेची गृहविभागाने लक्षवेधी सूचनेच्‍या उत्तरात दिलेली माहिती वस्‍तूस्‍थितीला धरून नसल्‍याविषयी राणे यांनी अप्रसन्‍नता व्‍यक्‍त केली.

(म्‍हणे) ‘ही लक्षवेधी सूचना सामजिक तेढ वाढवणारी आहे !’ – आमदार बाळासाहेब थोरात, काँग्रेस

बाळासाहेब थोरात

नितेश राणे हिंदूंवरील अत्‍याचारांची माहिती देत असतांना काँग्रेसचे नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात म्‍हणाले, ‘‘नितेश राणे यांच्‍या विधानांवर माझा आक्षेप आहे. या लक्षवेधी सूचनेतील माहिती मोठी असून हिंदु आणि मुसलमान यांच्‍यात सामाजिक तेढ वाढवणारी आहे. याला माझा विरोध आहे. अशा प्रकारची लक्षवेधी सूचना सरकारने स्‍वीकारू नये. या प्रकरणाला धर्माचे स्‍वरूप देऊ नये. आपल्‍याला राज्‍य शांततेने चालवायचे आहे.’’

रामनगर येथील हिंदूंवरील झालेल्‍या अत्‍याचारांच्‍या घटनांत तथ्‍य ! – देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्‍हणाले, ‘‘इतर वेळी दीड पानाची लक्षवेधी सूचना असते, तर ही लक्षवेधी सूचना केवळ अर्ध्‍या पानाची आहे. रामनगर येथे घडलेल्‍या गोष्‍टीत तथ्‍य असल्‍याने जातीय तेढ वाढवण्‍यासारखे काही नाही.’’ फडणवीस पुढे म्‍हणाले, ‘‘अफझल शेख याच्‍यावर भारतीय दंड विधान संहिता कलम ३०७ अन्‍वये गुन्‍हा नोंद असतांना त्‍याला अटक व्‍हायला हवी होती; मात्र त्‍याला अटकपूर्व जामीन कसा मिळतो ? याविरोधात उच्‍च न्‍यायालयात पोलिसांनी अपील का केले नाही ? हे पाहिले जाईल. धर्मांधांनी हिंदूंच्‍या घरांतील हिंदु देवतांच्‍या चित्रांची केलेली विटंबना नितेश राणे यांनी मला दाखवली आहे. यामध्‍ये मुसलमानांनी हिंदूंवर अत्‍याचार केल्‍याचे स्‍पष्‍ट दिसते. त्‍यामुळे या प्रकरणाला हिंदु-मुसलमान जातीय तेढ असे स्‍वरूप कुणी देऊ नये.’’