चीनने तैवानशी युद्ध केल्यास तैवानच्या बाजूने लढणार्‍या अमेरिकेचा स्फोटकांचा साठा एका सप्ताहात संपेल ! – अहवालातील खुलासा

वॉशिंग्टन (अमेरिका) – तैवानवरून अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव वाढत चालला असून येत्या काळात त्याचे युद्धात रूपांतर होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ‘फोर्ब्स’च्या एका अहवालानुसार, चीनच्या तुलनेत अमेरिकेचे आक्रमण करण्याचे सामर्थ्य अल्प झाले आहे. याचे कारण चीनची स्फोटके बनवण्याची क्षमता फार वाढली आहे, तर अमेरिकेचे कारखाने यात मागे पडले आहेत. एवढेच नाही, तर चीनने आता ‘आर्.डी.एक्स.’ किंवा ‘एच्.एम्.एक्स.’ स्फोटकांपेक्षा ४० टक्के अधिक घातक स्फोटके बनवली आहेत. चीनने तैवानशी युद्ध केल्यास तैवानच्या बाजूने लढणाराया अमेरिकेचा स्फोटकांचा साठा एका सप्ताहात संपेल, असा खुलासा या अहवालात करण्यात आला आहे.

‘फोर्ब्स’ने असेही म्हटले आहे की, सैनिकी स्फोटके बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या रसायनांसाठी अमेरिका चीनवर अवलंबून आहे. अमेरिकेला चीनमधून न्यूनतम  ६ रसायने आयात करावी लागतात. तैवानमध्ये युद्ध झाल्यास अमेरिकेला चिनी क्षेपणास्त्रांचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागेल. चीनच्या अनेक क्षेपणास्त्रांची ताकद अमेरिकेपेक्षा अधिक आहे. याचे कारण चीनने नवीन प्रकारची स्फोटके विकसित केली आहेत.