‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांचा ‘षष्ठ्यब्दीपूर्ती’ सोहळा उत्साहात साजरा !

श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना श्रीकृष्णाचे चित्र देतांना श्रीमती स्मिता नवलकर, समवेत श्री. निनाद गाडगीळ, तसेच श्री. परीक्षित रवींद्र प्रभुदेसाई

ठाणे – ज्येष्ठ मराठी उद्योजक आणि ‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांचा षष्ठ्यब्दीपूर्ती (६० वा वाढदिवस) कार्यक्रम ३ मार्च या दिवशी येथे पार पडला.

यानिमित्त पितांबरीचे उत्पादन ‘रुचियाना गूळ पावडर’ दान करण्याच्या उद्देशाने रविंद्र प्रभुदेसाई यांची त्याच गूळ पावडरने तुला करण्यात आली. या वेळी प्रभुदेसाई यांच्या कुटुंबियांसमवेत ‘सॅटरडे क्लब’, उद्योग अनुभव प्रतिष्ठान, कर्‍हाडे ब्राह्मण संघ, ‘बिजनेस फोरम’ या संस्थांचे पदाधिकारी, तसेच ठाणे शहरातील संघ परिवार, सामाजिक, साहित्यिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळी तसेच कलाकार उपस्थित होते. मराठी उद्योजक म्हणून गेली ३४ वर्षे राज्याच्या उद्योग क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. या अनुषंगाने ज्येष्ठ मुलाखतकार श्री. सुधीर गाडगीळ यांनी श्री. प्रभुदेसाई यांना मुलाखतीच्या माध्यमातून बोलते केले आणि त्यांचा ६० वर्षांचा जीवनपट उपस्थितांसमोर उलगडला.

कोकणात पर्यावरणपूरक काम करण्यासाठी पितांबरीच्या माध्यमातून ७ लाख वृक्षांची लागवड केली असून भविष्यात १ कोटी झाडे लावण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. या वेळी प्रभुदेसाई यांच्यावर सिद्ध केलेला माहितीपट दाखवण्यात आला. तसेच सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा आशीर्वादपर संदेश, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमदार संजय केळकर, ॲड्. निरंजन डावखरे, ‘दीपस्तंभ’चे यजुर्वेंद्र महाजन यांचे शुभेच्छापर संदेशही दाखवण्यात आले.

गेली अनेक वर्षे प्रभुदेसाई हे वाढदिवसानिमित्त स्वत:च्या वयाइतक्या रकमेची देणगी काही सामाजिक संस्थांना देतात. त्यानुसार या वर्षीही ६० व्या वाढदिवसानिमित्त १२ वर्षे आणि त्याहीपेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या सामाजिक संस्थांना प्रत्येकी ६० सहस्र रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच ‘पितांबरी’ आस्थापनातील सहकारी वर्गालाही या वेळी विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

सनातन संस्थेच्या वतीने सन्मान !

सनातन संस्थेच्या वतीने श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना सनातननिर्मित श्रीकृष्णाचे चित्र भेट म्हणून देण्यात येऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी सनातनच्या साधिका श्रीमती स्मिता नवलकर आणि साधक श्री. निनाद गाडगीळ उपस्थित होते.