ओझ्याविना अध्ययन !

वर्ष १९९३ मध्ये प्राध्यापक यशपाल यांनी ‘ओझ्याविना अध्ययन’ या नावाने भारत सरकारला एक अहवाल सादर केला होता. त्या अहवालाच्या संदर्भाने राष्ट्रीय स्तरावर कार्यवाही होणे अपेक्षित होते; मात्र ती ३० वर्षे होत आली तरी तसे झाले नाही, हे भारतीय शिक्षणव्यवस्थेसाठी लाजिरवाणे नव्हे का ?

के.ई.एम्. रुग्णालयाच्या आधुनिक वैद्यांनी वर्ष २०१८ मध्येच सर्वेक्षण करून असे सांगितले होते की, मुंबई येथील ४१ टक्के विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यामुळे पाठदुखीचा त्रास चालू झाला असून या तक्रारींकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर आरोग्याच्या अन्य तक्रारी वाढू शकतात. मुलांच्या वाढत्या वयात दप्तराच्या ओझ्यामुळे त्यांच्या विशिष्ट अवयवांवर विपरीत परिणाम होणे, हे अत्यंत गंभीर आहे. यासाठी पालकांनीही मुलांच्या आरोग्याविषयी सजग होणे आवश्यक आहे.

गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे सतत वाढत असून हे न्यून करण्यासाठी अनेक स्तरांतून मतमतांतरे आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही दप्तरांचे ओझे हलके करण्यासाठी सूचना केल्यावर शासनस्तरावरून कार्यवाही चालू झाली. त्यानुसार राज्यातील मराठी माध्यमाच्या अभ्यासक्रमाची नव्याने मांडणी करत राज्य पाठ्यपुस्तक आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने ‘एकात्मिक पाठ्यपुस्तक’ योजनेची कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला, म्हणजे एकाच पाठ्यपुस्तकात एकामागे एक अशा सर्व विषयांचा समावेश असेल. त्याचसमवेत महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने जून २०२३ पासून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे न्यून व्हावे; म्हणून पाठ्यपुस्तकात महत्त्वाचा पालट करण्याचा निर्णय घेतला आहे. पाठ्यपुस्तकातच वह्यांची पाने छापण्यात येणार असून वर्गाच्या अभ्यासक्रमानुसार त्या पुस्तकाचे भाग पाडण्यात येणार आहेत. प्रत्येक पाठ किंवा घटकानंतर ‘माझी नोंद’ नावाने ही पाने असणार आहेत. यावर पाठाशी संबंधित सराव, वर्गकार्य, गृहपाठ लिहायचा आहे. अशी इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंतची पाठ्यपुस्तके छापण्यात येणार आहेत.

एकूणच काय, तर आताची शिक्षणपद्धत ही अनेक अंगांनी अपूर्ण आहे, हे या माध्यमातून समोर येत आहे. विद्यार्थी जीवनात येणार्‍या सर्वच परिस्थितीला कसा सामोरे जाऊ शकतो ? यासाठी त्याला सिद्ध करणे आवश्यक आहे. त्यानुसार कोणता विषय किती आणि कसा शिकवला गेला पाहिजे ? याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. यासाठी सध्याची लॉर्ड मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धत पालटून पूर्वीची गुरुकुल पद्धत पुन्हा नव्याने चालू होणे अनिवार्य आहे.

– श्री. नीलेश पाटील, जळगाव