महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजने’तून ५ लाखापर्यंत विमा संरक्षण मिळणार !

मुंबई, ९ मार्च (वार्ता.) – ‘महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजने’च्या अंतर्गत महाराष्ट्रात देण्यात येणारे दीड लाख रुपयांच्या विमा संरक्षणाच्या रकमेत ५ लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात येत असल्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत केली. या योजनेच्या अंतर्गत विम्याच्या रकमेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी ९ मार्च या दिवशी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात केली. यावर मंत्र्यांनी वरील घोषणा केली.


राज्यात आयुर्वेदासह विविध उपचारपद्धती आहे. शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये मात्र त्यांचा समावेश करण्यात आलेले नाही, असे नमूद करत शासकीय योजनेत आयुर्वेद उपचारपद्धतीचा सामावेश करण्याची मागणी आमदार राहुल पाटील यांनी केली. याविषयी विविध उपचारपद्धतींमधील तज्ञ, लोकप्रतिनिधी यांची समिती स्थापन करून राज्याच्या मुख्य सचिवांकडून येत्या ३ मासांत याविषयीचा अहवाल घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले.