राष्ट्रीय जलमार्गामुळे पणजी ते वास्को अंतर २० मिनिटांत कापता येणार !

  • एकूण ९ कि.मी.ने अंतर उणावले !

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रशंसा !

हे अंतर आता नौकेतून २० मिनिटांत कापता येणार !

पणजी, ५ मार्च (वार्ता.) – राष्ट्रीय जलमार्ग ६८ मुळे पणजी ते वास्को अंतर ९ किलोमीटरने उणावले आहे. हे अंतर आता नौकेतून २० मिनिटांत कापता येणार आहे. पणजी ते वास्को हे अंतर
३२ किलोमीटर असून ते पार करण्यासाठी ४५ मिनिटे लागत. केंद्रीय जहाजोद्योग तथा बंदर आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ट्वीटवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना यामुळे स्थानिकांना दिलासा आणि पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे म्हटले आहे.

रस्ता वाहतुकीवरील ताण न्यून करण्यासाठी सरकार जलमार्गाचा अधिक वापर करण्यावर भर देत आहे. गोव्यातील प्रमुख नद्यांमधील गाळ उपसून जलमार्ग सुकर करण्यासाठी ११५ कोटी रुपये व्यय (खर्च) करून कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये पणजी-वास्को जलमार्ग सुकर करण्यासह हळदोणा, बेती, बिठ्ठोण, खोर्जुवे, पाेंबुर्फा, दुर्भाट, जुने गोवे, चोडण, रायबंदर आदी ठिकाणी जहाज नांगरायला ‘टर्मिनल’ उभारण्यासाठी केंद्रीय जलमार्ग मंत्रालयाने यापूर्वीच सविस्तर प्रकल्प अहवाल (डी.पी.आर्.) सिद्ध केला आहे. या योजनेच्या अंतर्गत ९ ठिकाणी १०० कोटी रुपये खर्चून ‘जेटी’ बांधण्यात येणार आहे.

याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, ‘‘क्रूझ’ जहाजांसाठी ‘टर्मिनल’, तसेच इतर सुविधा उभारण्यासाठी मुरगाव पोर्ट ट्रस्टला आवश्यक निधी देण्यात आला आहे. वास्को ते दोनापावला या जलमार्गावर वाहनांना ये-जा करण्यासाठी ‘रो-रो’ सेवाही (‘रो-रो’ म्हणजे ‘रोल ऑन-रोल ऑफ’. या वाहतूक पद्धतीत वाहने जहाजावर चढवून वाहून नेण्यात येतात. यामुळे वाहतुकीचा खर्च आणि वेळ वाचतो.) चालू करण्यात येणार आहे.’’