कवयित्री बहिणाबाईंच्या कविता म्हणजे ‘शाश्वत तत्त्वज्ञान आणि आधुनिक विज्ञान’, यांचा समन्वय ! – कवी इंद्रजित भालेराव

कवी इंद्रजित भालेराव

मिरज – बहिणाबाई चौधरींच्या ‘मन’,‘जीव’, ‘संसार’ आणि ‘देव’ यांसारख्या अनेक कविता म्हणजे शाश्वत तत्त्वज्ञान आणि आधुनिक विज्ञान’, यांचा ग्रामीण भाषेतील सहज सुलभ समन्वय होय. प्रत्येक कवी, साहित्यिक आणि संशोधक यांच्या मनातील चिरंतन संशोधनाचे हे विषय बहिणाबाई चौधरींच्या कवितांमधून सहज सुलभ, तसेच सोप्या पद्धतीने ग्रामीण भाषेत मांडले. अनेक अभ्यासक्रमात अभ्यासल्या जात असलेल्या या कविता मराठी साहित्यात दीपस्तंभ ठरल्या आहेत, असे मत कवी इंद्रजित भालेराव यांनी व्यक्त केले.

विद्यामंदिर प्रशाला येथे मराठी राजभाषादिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात कवी भालेराव यांनी स्वतः रचलेल्या अनेक प्रसिद्ध कविता सादर केल्या. ‘मिरज विद्या समिती’चे श्री. शैलेश देशपांडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजीव कुलकर्णी यांसह अनेक मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते.