तुर्भे – सामाजिक कार्यातील योगदानाविषयी ‘रायगडभूषण’ डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांना राजस्थान येथील जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाल विद्यापिठाच्या वतीने मानाची ‘डी.लिट.’ पदवी घोषित करण्यात आली आहे. ५ मार्च या दिवशी सकाळी ११ वाजता वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित समारंभात ही ‘डी.लिट.’ मानाची पदवी देऊन श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात श्री संप्रदायाचे १ लाखाहून अधिक सदस्य उपस्थिती असणार आहेत. ‘रायगडभूषण’ डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांना यापूर्वी युरोपियन इंटरनॅशनल विद्यापीठ, फ्रान्सच्या ‘डी. लिट.’ पदवीसह अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
डॉ. सचिनदादा धर्माधिकारी हे गेली अनेक वर्षे ‘महाराष्ट्रभूषण’ डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक प्रबोधनाचे कार्य करत आहेत. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे समाजाभिमुख उपक्रम राबवणारे प्रतिष्ठान आहे. सामाजिक बांधिलकी आणि समाजऋणांची जाणीव ठेवून हे प्रतिष्ठान सातत्याने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे.