महाराष्ट्रातील प्रस्तावित वीज दरवाढ रहित करा ! – ‘मास’ संघटनेची मागणी

सातारा, ४ मार्च (वार्ता.) – गुजरात राज्यात सध्याचे औद्योगिक वीजदर आपल्यापेक्षा २५ आणि ३५ टक्क्यांनी अल्प आहेत. महाराष्ट्रात प्रस्तावित वीज दरवाढ अत्यंत गंभीर आणि घातक परिणाम होणारी ठरणार आहे. त्यामुळे संपूर्ण वीज दरवाढ रहित करून गुजरात राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील वीज दर अल्प करावेत, अशी मागणी ‘मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ने (‘मास’ संघटनेने) पत्राद्वारे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तत्पूर्वी मास संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी कृष्णानगर येथील वीज वितरण आस्थापनाच्या कार्यालयाबाहेर वीजदेयकांची होळी केली.

ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, औद्यागिक, घरगुती, व्यावसायिक आणि शेती या ४ मुख्य वर्गवारीतील वीज दर सर्वाधिक आहेत. वीज दरवाढ केली, तर त्याचे सर्वच क्षेत्रांवर अनिष्ट परिणाम होतील. वीज दरवाढीमुळे उद्योग अडचणीत आले आहेत. सध्याचा सरासरी वीजदर प्रतियुनिट ७ रुपये २० पैसे एवढा आहे. यामध्ये इंधन समायोजन आकार समाविष्ट केल्यास तो ७ रुपये ७९ पैसे एवढा होतो. ‘महावितरण’ने तोच वीजदर पुढील २ वर्षांसाठी अनुक्रमे ८ रुपये ९० पैसे आणि ९ रुपये ९२ पैसे निश्चित केला आहे. हे अन्यायकारक आहे.