हिंदु जनआक्रोश मोर्चा : हिंदूंची हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेच्‍या दिशेने पडणारी विजयाची पावले !

काही मासांपूर्वी घडलेले आणि अवघ्‍या देशाला हादरवून सोडलेले श्रद्धा वालकर हत्‍या प्रकरण पुष्‍कळ गाजले. श्रद्धाच्‍या मृतदेहाचे ३५ तुकडे केल्‍याचे वृत्त उघड झाल्‍यापासून जनसामान्‍यांच्‍या भावना अधिक संतप्‍त होऊ लागल्‍या. यानंतर समाजात होणार्‍या जनजागृतीने वेगळेच वळण घेतले. ९ राज्‍यांमध्‍ये ‘लव्‍ह जिहाद’विरोधी कायदा आहे; पण महाराष्‍ट्रातच नाही. ‘येथेही हा कायदा लागू व्‍हायला हवा’, ही मागणी जोर धरू लागली. श्रद्धाचा मारेकरी धर्मांध आफताब याच्‍या प्रकरणात न्‍यायनिवाडा होऊन त्‍याला कधी शिक्षा होईल, हे ठाऊक नाही; पण हिंदूंमधील भावनांचा उद्रेक झाला, तो ‘हिंदु जनआक्रोश मोर्च्‍या’च्‍या रूपाने ! हिंदू दूरदूरवरून येऊन मोर्च्‍यात सहभागी झाले. त्‍यांनी ना स्‍थळ-काळाचा विचार केला, ना पैशांचा ! धर्मभावनेच्‍या बळावर मोर्च्‍यांना हिंदूंचे संघटन लाभले. त्‍यासाठी ना आमीष दाखवले गेले, ना कुठली जाहिरातबाजी केली. हिंदूंनी हिंदुत्‍वासाठी केलेला हा त्‍यागच आहे. मोर्च्‍यात महिलाही मोठ्या प्रमाणात रस्‍त्‍यावर उतरल्‍या. मोर्च्‍यात ठिकठिकाणच्‍या हिंदूंचे धर्मनिष्‍ठतेसाठी संघटन झाल्‍याने त्‍यातून कुटुंबभावना वृद्धींगत झाली.

सर्वत्र फडकणारा भगवा म्‍हणजे हिंदू जागृत झाल्‍याचे लक्षण !

हिंदूंच्‍या भव्‍य संघटनामुळे एकप्रकारे दबाव निर्माण झाला. ‘या दबावापोटी तरी शासन, प्रशासन हिंदूंच्‍या संघटनाची नोंद घेत लव्‍ह जिहादच्‍या विरोधात कृती करेल’, अशी अपेक्षा करूया. इतके दिवस आपण मुसलमान किंवा ख्रिस्‍ती यांचेच भव्‍य संघटन पहात होतो; पण हिंदूही संघटनशक्‍तीच्‍या जोरावर सर्वांच्‍या हृदयात धडकी भरवू शकतात, हे याद्वारे लक्षात आले. आता केवळ संघटित झालेल्‍या या हिंदुशक्‍तीला योग्‍य दिशा देण्‍याची आवश्‍यकता आहे. हिंदूंमुळे आज भगवा रस्‍त्‍यारस्‍त्‍यावर फडकला. हा फडकणारा भगवा म्‍हणजे सर्वत्रचे हिंदू जागृत झाल्‍याचेच लक्षण आहे. हिंदु जनआक्रोश मोर्चा म्‍हणजे हिंदु राष्‍ट्राची नांदीच आहे.

मोर्च्‍याचे राजकारण केले जाणे अयोग्‍य !

सौ. नम्रता दिवेकर

अनुमाने २२ मोर्च्‍यांमध्‍ये सहभागी होणारे हिंदुत्‍वनिष्‍ठ कार्यकर्ते श्री. विक्रम पावसकर म्‍हणाले, ‘‘या मोर्च्‍यांचे फलित म्‍हणजे प्रत्‍येक मोर्च्‍यानंतर २५ सहस्र मुली ‘लव्‍ह जिहाद’मध्‍ये अडकण्‍यापासून नैसर्गिकरित्‍या वाचल्‍या.’’ मोठी फलनिष्‍पत्ती मिळवून देणार्‍या मोर्च्‍याच्‍या आडून राजकारणही केले जात आहे. मोर्च्‍यात सहभागी होणारे पक्ष मते मिळवण्‍यासाठी, तसेच निवडणुकीचे उद्दिष्‍ट समोर ठेवत आहेत, असा आरोप होत आहे. हे राजकारण अयोग्‍य आहे. वर्तमानपत्रांनीही मोर्च्‍याच्‍या वृत्तांना प्रसिद्धी दिली; पण त्‍यात हिंदूंच्‍या संघटनाचे कौतुक झाले नाही. केवळ मोर्चा आणि राजकारण यांवरच लिखाण केले गेले. मुसलमान संघटित झाले की, कुणी आक्षेप घेत नाही; पण हिंदू संघटित झाल्‍यावर गवगवा केला जातो, त्‍याला जातीयवादाचा रंग दिला जातो. थोडक्‍यात काय, तर हिंदूंचे विचार आणि त्‍यांच्‍या भावना यांना दडपण्‍याचाच प्रयत्न होतो.

हिंदूंनो, ही धर्माच्‍या अस्‍तित्‍वाची लढाई आहे. स्‍वातंत्र्यासाठी क्रांतीकारकांनी त्‍याग केला, तो त्‍याग आपल्‍यालाही हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी करायचा आहे. तुमच्‍यात निर्माण झालेला जोश, उत्‍साह, तसेच जागृत झालेली प्रेरणा तशीच ठेवा. हिंदूंच्‍या विजयाची पताका आता फडकू लागलेली आहे. हिंदु राष्‍ट्र येईपर्यंत ही वाटचाल आपल्‍याला अखंड करत रहायची आहे, हे लक्षात ठेवा !

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.२.२०२३)