मुंबई, २ मार्च (वार्ता.) – नाफेडच्या माध्यमातून ३ आस्थापनांकडून कांद्यांची खरेदी चालू असून आतापर्यंत १८ सहस्र ७४३ क्विंटल कांदा खरेदी केला आहे. कांदा उत्पादक शेतकर्यांना शासन साहाय्य करेल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी २ मार्च या दिवशी सभागृहात केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर बोलतांना नाफेडद्वारे शेतकर्यांऐवजी व्यापार्यांकडून खरेदी करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.
सौजन्य महाएमटिबी
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘शेतकर्यांकडून कांदा खरेदीसाठी राज्यात १० केंद्रे चालू आहेत. वर्ष २०१७ आणि २०१८ मध्येही शासनाने कांदा उत्पादक शेतकर्यांना साहाय्य केले आहे. त्यानुसार या वेळीही शासन शेतकर्यांना साहाय्य करेल; परंतु लाभ व्यापार्यांना नव्हे, तर शेतकर्यांना मिळायला हवा. त्यादृष्टीने लवकरच साहाय्य केले जाईल.’’