इतिहासाच्या माध्यमातून सावरकरांचा त्याग समाजासमोर मांडावा ! – रणजीत सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

अंदमानच्या पोर्ट ब्लेअरमधील ‘सेल्युलर जेल’ येथे ‘शब्दामृत प्रकाशन’च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

अनुक्रमे डावीकडून पहिले ‘शब्दामृत प्रकाशन’चे प्रमुख श्री. पार्थ बावस्कर, केंद्रीय मंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंह, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्र्यांचे सचिव

अंदमान, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – सावरकरांचा त्याग प्रचंड आहे. इतिहासाच्या माध्यमातून त्यांचा त्याग समाजासमोर मांडला पाहिजे, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवर सावरकर यांचे नातू आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष श्री. रणजीत सावरकर यांनी केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५७ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून अंदमानच्या पोर्ट ब्लेअरमधील ‘सेल्युलर जेल’ येथे २६ फेब्रुवारी या दिवशी ‘शब्दामृत प्रकाशन’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी केंद्रीय मंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंह, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ‘शब्दामृत प्रकाशन’चे प्रमुख श्री. पार्थ बावस्कर, कु. मुग्धा वैशंपायन, तसेच महाराष्ट्र आणि गोवा येथून आलेले सावरकरप्रेमी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दीपप्रज्वलन केले. उपस्थितांनी सावरकरांची ‘जयोस्तुते श्री महनमंगले शिवास्पदे शुभदे’ आणि ‘सागरा प्राण तळमळला’ ही संपूर्ण गीते गायली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शुभांगी दलाल यांनी केले. हिंदुत्वनिष्ठ अभिनेते श्री. शरद पोंक्षे आणि श्री. पार्थ बावस्कर यांच्याद्वारे संचालित करण्यात येणार्‍या ‘शब्दामृत प्रकाशन’ संस्थेकडून वर्ष २०२१ पासून अंदमानचा दौरा आयोजित केला जात आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित रहाता येणे, हे माझे भाग्य ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

स्वातंत्र्यवीर सावरकरांना वंदन करतांना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, सावरकरांनी एवढ्या लहान कोठडीमध्ये इतकी वर्षे काढली. आपल्याला कुणी ५ मिनिटे अशा ठिकाणी बसायला सांगितले तर काय होईल ?, याची कल्पनाही आपण करू शकत नाही. या कार्यक्रमाला उपस्थित रहाणे, हे मी माझे भाग्य समजतो. हे भाग्य मला ‘शब्दामृत प्रकाशन’मुळे मिळाले.

सावरकरांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी ब्रिटिशांचे प्रयत्न ! – पार्थ बावस्कर, शब्दामृत प्रकाशन प्रमुख

अनुक्रमे डावीकडून पहिले स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजीत सावरकर, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, श्री. पार्थ बावस्कर, कु. मुग्धा वैशंपायन

‘शब्दामृत प्रकाशन’चे प्रमुख पार्थ बावस्कर म्हणाले, ‘‘ब्रिटीशांनी या कारागृहात सावरकरांचे अधिकाधिक मानसिक खच्चीकरण करण्याच्या दृष्टीने सर्व योजना आखल्या. अंदमानात या सगळ्या भयानक शिक्षांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत.