मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची अंदमान येथील ‘सेल्युलर जेल’ला भेट देऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली

‘सेल्युलर जेल’मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली वहातांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी – अंदमान येथील ‘सेल्युलर जेल’ला भेट देऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना त्यांच्या ५७ व्या ‘आत्मार्पण’ दिनानिमित्त आदरांजली अर्पण केली.

याविषयी डॉ. सावंत म्हणाले, ‘‘ज्या कोठडीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ठेवण्यात आले होते आणि त्यांनी सश्रम कारावास भोगला होता, तेथे भेट देऊन प्रार्थना करण्याचा मला सन्मान वाटतो. भारताच्या क्रांतीकारी स्वातंत्र्यसैनिकांच्या पवित्र स्थळी अशा कार्यक्रमाचे साक्षीदार होण्याची संधी मिळाल्याने मी धन्यता मानतो.’’ या ठिकाणी शब्दामृत संस्थेने आयोजित केलेल्या संमेलनात त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

या वेळी शब्दामृतचे प्रमुख श्री. पार्थ बावस्कर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू श्री. रणजित सावरकर, युवा गायिका मुग्धा वैशंपायन आणि महाराष्ट्र अन् गोव्यातील सावरकर भक्त उपस्थित होते. सेल्युलर जेलमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी १०१ दिवे प्रज्वलित करण्यात आले. संमेलनात सावरकरांनी लिहिलेली गाणी गाण्यात आली.