मराठी भाषेवर प्रेम करणे, हे आपले कर्तव्‍य ! – कवी प्रा. अशोक बागवे

प्रा. अशोक बागवे

नवी मुंबई, २७ फेब्रुवारी (वार्ता.) – जसे जगण्‍यासाठी काम करणे, हे आपले कर्तव्‍य आहे, तसे मराठी ही मातृभाषा असल्‍याने आपल्‍या मराठी भाषेवर प्रेम करणे, हे आपले कर्तव्‍य आहे, असे प्रतिपादन कवी प्रा. अशोक बागवे यांनी बेलापूर येथे केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या वतीने कवी कुसुमाग्रज यांच्‍या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन महापालिकेच्‍या मुख्‍यालयात करण्‍यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून ते बोलत होते.

प्रा. बागवे म्‍हणाले की, आपली मराठी मातृभाषा समृद्ध आहे. आपली भाषा गावाच्‍या मातीतून आलेली आहे. भाषा सहज सोपी असली पाहिजे. जसे आपण विविध प्रदेशांतील लोकांना सामावून घेतले आहे, तसे मराठी भाषेनेही अन्‍य भाषांतील शब्‍द सामावून घेतले आहेत. मराठी भाषा कुणाचा द्वेष करत नाही. आपण सर्वांनी मराठीतून बोलण्‍याचा आग्रह धरणे आवश्‍यक आहे. आपण भाषेकडे दुर्लक्ष करतो; म्‍हणून तिचे सौंदर्य कळत नाही. कोणता शब्‍द कुठे वापरायचा, हे कळले पाहिजे. महाराष्‍ट्रातील विविध ठिकाणच्‍या भाषांतील शब्‍दांवरून गमती-जमती कशा होतात, हेही प्रा. बागवे यांनी या वेळी विषद केले.

महापालिकेचे आयुक्‍त राजेश नार्वेकर या वेळी म्‍हणाले की, आपण १ मे ‘मराठी भाषा दिन’ म्‍हणून साजरा करतो, तर २७ फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रज यांचा जन्‍मदिन ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्‍हणून साजरा करतो. या निमित्ताने मराठी भाषेच्‍या सामर्थ्‍याचे स्‍मरण करणे आवश्‍यक आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्‍यापूर्वीही मराठी भाषेचे शब्‍द मराठी वाङ्‌मयात सापडतात. ‘अमृतासमवेत पैजा जिंकण्‍या’चे सामर्थ्‍य मराठी भाषेत आहे, हे संत ज्ञानेश्‍वर महाराज यांनी दाखवून दिले. त्‍यानंतर संत तुकाराम महाराज, संत रामदासस्‍वामी यांच्‍यासह अनेक साहित्‍यिकांनी परिवर्तनाचे मोठे काम केले आहे. ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’, ‘वेडात मराठे वीर दौडले’ अशी शरिरात चैतन्‍य निर्माण करणारी गीते लिहिणारे कसुमाग्रज आपल्‍याला लाभले. अशा समृद्ध सरस्‍वतीची सेवा करण्‍याचे भाग्‍य सर्वांना प्राप्‍त होवो.

सूत्रसंचालक तथा नवी मुंबई महापालिकेचे महेंद्र कोंडे यांनी या वर्षी संत कवींच्‍या ओळी चित्रफितीच्‍या रूपातून संपूर्ण शहरात साकारण्‍यात येणार असल्‍याचे या वेळी सांगितले. मागील वर्षी स्‍वच्‍छ सर्वेक्षण अभियानामध्‍ये शहरात विविध कवींच्‍या ५२ मराठी कवितांच्‍या ओळी भिंती आणि अन्‍य ठिकाणी लिहिण्‍यात आल्‍या. तसेच स्‍वच्‍छ कवी संमेलन भरवले होते, त्‍याची विशेष नोंद केंद्र शासनाने घेतली, असे कोंडे यांनी या वेळी सांगितले.