मुंबई, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – गेल्या ७ मासांत शेतकर्यांच्या खात्यात १२ सहस्र कोटी रुपये दिले आहेत, तसेच सरकारने २३ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. ५ लाख हेक्टरांहून अधिक भूमी ओलिताखाली येईल. अधिवेशनात लोकहिताचे निर्णय घेतले जातील. लोकायुक्तांचे विधेयक संमत करण्याचा या अधिवेशनात प्रयत्न असेल. सर्व पक्षांनी लोकायुक्तांच्या कायद्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. २७ फेब्रुवारीपासून येथे विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की,
१. अधिवेशनात विरोधकांनी लोकहिताची सूत्रे मांडावीत. त्यांच्या प्रश्नावर उत्तरे द्यायला आम्ही सिद्ध आहोत. प्रलंबित विधेयकांमध्ये लोकायुक्ताचे विधेयक संमत करण्याचा आग्रह असेल. या कायद्यामुळे पारदर्शकता येणार असून त्याला विरोधकांनी साहाय्य करावे.
२. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीदिनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अवमान केला आहे. त्यावर आता उद्धव ठाकरे बोलणार आहेत का ? ज्यांची गळाभेट घेता ते प्रतिदिन सावरकरांचा अवमान करतात.
३. विरोधी नेत्यांना धमकी देण्यात आल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. त्याची चौकशी करण्यात येईल. विरोधकांनी सकारात्मक सूत्रे मांडावीत. त्याच्यावर चर्चा केली जाईल.
४. या अधिवेशनातून आम्ही जनतेच्या प्रश्नांवर भर देऊ. रखडलेल्या योजना आणि प्रकल्प आम्ही चालू केले आहेत. मुंबई येथील प्रकल्पांचे काम वेगात चालू आहे.
५. श्रीलंका, बांगला देश आणि पाकिस्तान या तिन्ही देशांत परकीय चलनांचा तुटवडा निर्माण झाल्याने या देशांनी आयात बंद केली आहे. त्यामुळे कांद्यांचे शुल्क घसरले आहेत. अल्प प्रतीच्या कांद्यातून वाहतुकीचा व्यय वजा करता येत नाही. असा व्यय करून एका शेतकर्याला २ रुपयांचा धनादेश देणार्या सूर्या आस्थापनाचा परवाना रहित केला आहे.
७० सहस्र कोटींच्या घोटाळ्याविषयी आम्ही काही बोललो का ? – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
धमक्या दिल्याचे खोटेनाटे आरोप केले जात आहेत. भाजपचे नेते नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठवले. अभिनेत्री केतकी चितळे हिला कारागृहात टाकले. अभिनेत्री कंगना रणौतचे घर तोडले. भाजपचे नेते गिरीश महाजन यांना मोक्का लावण्याचा प्रयत्न केला, तर देवेंद्र फडणवीस यांना कारागृहात टाकण्याचा प्रयत्न केला गेला; परंतु विरोधक आमच्यावर आता खोटेनाटे आरोप करत आहेत. आम्हाला लोकांचे प्रेम मिळत आहे, त्यामुळे अजित पवार यांच्या पोटात दुखत आहे. वर्षा बंगल्यावर लोक भेटायला आल्यानंतर त्यांना चहापाणी द्यायला पाहिजे का नको ? ही आपली संस्कृती आहे; परंतु यावरून अजित पवार आरोप करत आहेत, हे अयोग्य आहे. ७० सहस्र कोटींच्या सिंचन घोटाळ्याविषयी आम्ही काही बोललो का ?