डोंबिवली – ‘ब्राह्मण बिजनेस नेटवर्क ग्लोबल संस्थे’च्या मुंबई विभागाच्या वतीने ब्राह्मण उद्योजकांसाठी दोन दिवसांच्या परिषदेचे येथे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी उद्योग जगतात उल्लेखनीय कार्य करणार्या ब्राह्मण उद्योजकांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षी या कार्यक्रमांतर्गत ‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.’चे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘उद्यम कौस्तुभ’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात पार पडला. श्रीपाद खेर, संदीप झा, अमित महाजन, अरविंद कोर्हाळकर, हेमंत वैद्य, जितेंद्र जोशी अशा मान्यवरांनाही संस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
सन्मानप्रसंगी श्री. रवींद्र प्रभुदेसाई म्हणाले, ‘‘कोणताही व्यवसाय १०० वर्षे टिकायला हवा. त्याचा ‘टर्नओव्हर’ १०० कोटी असावा आणि उद्योजकाकडे १०० एकर भूमी असावी, हा दृष्टीकोन ठेवून नवउद्योजकांनी काम केले पाहिजे.’’ पुरस्कारासाठी कृतज्ञता व्यक्त करतांना ‘ब्राह्मण बिजनेस नेटवर्क ग्लोबल संस्थे’च्या कार्याविषयीही त्यांनी प्रशंसोद्गार काढले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, मुकुंद कुलकर्णी, अरविंद नांदापूरकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांडगे, अभिनेते प्रशांत दामले उपस्थित होते.