पाकिस्तानने केवळ गरीब लोकांनाच अनुदान द्यावे !

कर्ज देण्याच्या बदल्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकला अट

म्युनिक (जर्मनी) – आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानमध्ये तेथील जनता आता भुकेकंगाल होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पाकने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे कर्ज देण्याची याचना केली आहे. त्यावर नाणेनिधीने पाकसमोर काही अटी ठेवल्या आहेत. यांमध्ये केवळ गरीब लोकांनाच अनुदान देण्यात यावे, तसेच खासगी क्षेत्रांत चांगली कमाई करणार्‍या श्रीमंत जनतेने कर भरल्याची निश्चिती करावी, अशा काही अटींचा अंतर्भाव आहे.

पाकमध्ये सध्या पेट्रोल आणि वीज यांचे दर गगनाला भिडले असून विदेशी मुद्रा भांडार न्यूनतम स्तरावर असल्याचे सांगण्यात येत आहे. म्युनिक येथे चालू असलेल्या म्युनिक संरक्षण संमेलनात सहभागी झालेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टालिना जॉर्जीवा म्हणाल्या, ‘‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पाकिस्तानच्या गरीब जनतेला वाचवू इच्छिते. पाकिस्तानला भयावह स्थितीतून बाहेर काढण्यासाठी कठोर पावले उचलावी लागतील. यासाठी श्रीमंत पाकिस्तानी जनतेला अनुदान कदापि मिळू नये, याची निश्चिती पाकिस्तानने करणे आवश्यक आहे. यातूनच पाकिस्तान एक देश म्हणून सक्षमपणे उभा राहू शकेल.’’

संपादकीय भूमिका 

कर्जाच्या रूपात मिळालेला हा निधीही पाकिस्तान भारतविरोधी कारवायांत व्यय (खर्च) करील, यात शंका नाही ! तसे न करण्याची अटही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकला घालायला हवी !