शिवनेरीवर कायमस्वरूपी भगवा ध्वज लावण्याची मागणी अपूर्ण
पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असतांना अद्याप शिवनेरीवर भगवा ध्वज कायमस्वरूपी फडकवला नाही. वर्ष २०२१ पासून अनेक मंत्री आणि वरिष्ठ नेते यांना भेटून मी शिवनेरीवर कायमस्वरूपी भगवा ध्वज लावण्याची मागणी करत आहे. संसदेतही हा मुद्दा किंवा ही मागणी मी केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक) एवढेच नाही तर संसदेच्या अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतलेल्या बैठकीतही मागणी केली होती; मात्र अद्यापही ही मागणी पूर्ण न केल्याने शिवनेरीवर साजरा होणार्या शासकीय शिवजयंती सोहळ्यावर मी बहिष्कार घालणार आहे, असे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शिवनेरी येथे १८ ते २० फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. यात ‘शिवकालीन गाव’ हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. या वर्षी प्रथमच ‘महाशिव आरती’चेही आयोजन केले आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. जवळपास १ लाख शिवप्रेमी सहभागी होण्याचा अंदाज आहे, तसेच शासनाने या कार्यक्रमाचे निमंत्रण राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनाही दिले आहे.