अक्‍कलकोट येथील श्री स्‍वामी समर्थ यांच्‍या परंपरेतील थोर संत श्री गजानन महाराज यांच्‍या पावन पादुकांचे सनातनच्‍या रामनाथी आश्रमात शुभागमन !

श्री गजानन महाराजांच्‍या पादुकांचे भावपूर्ण दर्शन घेतांना श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि समवेत श्री. प्रतीक जरीपटके

रामनाथी, १३ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील सनातनच्‍या आश्रमात अक्‍कलकोट येथील श्री स्‍वामी समर्थ यांच्‍या परंपरेतील थोर संत श्री गजानन महाराज यांच्‍या पावन पादुकांचे शुभागमन झाले. म्‍हापसा, गोवा येथे होत असलेल्‍या सोमयागामध्‍ये सहभाग घेण्‍यासाठी श्री गजानन महाराज यांचे उत्तराधिकारी डॉ. राजीमवाले यांचे आणि श्रीपादुकांचे गोमंतकात आगमन झाले आहे.

श्री स्‍वामी समर्थ आणि श्री गजानन महाराजांचे छायाचित्र अन् पादुका

सनातनचे पुरोहित वेदमूर्ती सिद्धेश करंदीकर यांनी औक्षण करून पावन पादुकांचे सनातनच्‍या आश्रमात स्‍वागत केले. शारीरिक स्‍थिती अत्‍यंत कठीण असतांनाही सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी, तसेच श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्‍यासह सनातनच्‍या आश्रमातील साधकांनी पादुकांचे भावपूर्ण दर्शन घेतले.

सनातनच्‍या आश्रमाविषयी सेवेकरी श्री. वक्रतुंड औरंगाबादकर यांचा अभिप्राय

श्री स्‍वामी समर्थ यांच्‍या परंपरेतील संत श्री गजानन महाराज यांच्‍या पादुका विविध ठिकाणी दर्शनासाठी घेऊन जातो. त्‍या वेळी अनेक ठिकाणी भाविक, पूजक सनातनची उदबत्ती, अत्तर आदी पूजा साहित्‍याचा वापर करत असल्‍याने तेथील वातावरण सकारात्‍मक होऊन तेथे चैतन्‍य असल्‍याचे अनुभवतो. मी आणि माझी पत्नी साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करत असल्‍याने सनातनच्‍या कार्याची ओळख आहे. विविधप्रसंगी सनातनचे लघुग्रंथ भेट म्‍हणून देतो, त्‍या माध्‍यमातून या दैवीकार्यात आम्‍हाला सहभागी होता येते. आज आश्रमदर्शन केल्‍याने अध्‍यात्‍मप्रसाराचे कार्य कसे चालते ? याचा प्रत्‍यक्ष अनुभव घेता आला. सूक्ष्म शक्‍तींविषयी सनातनने केलेले आध्‍यात्मिक संशोधन सर्वांपर्यंत पोचले पाहिजे. अंतर्शुद्धीकरता झालेली चूक मान्‍य करणे, तसेच ती फलकावर लिहिणे यासाठी मनाचा मोठेपणा (आत्‍मबळ) आवश्‍यक आहे. तो साधकांमध्‍ये असल्‍याचे चुकांचा फलक पाहून लक्षात आले. अध्‍यात्‍म आणि साधना जाणून घेण्‍यासाठी सहकुटुंब आश्रमात पुन्‍हा अवश्‍य येईन.
– श्री. वक्रतुंड औरंगाबादकर, अक्‍कलकोट, जिल्‍हा सोलापूर (११.२.२०२३)

क्षणचित्र : या वेळी सेवेकरी शिवपुरी, अक्‍कलकोट येथील श्री. वक्रतुंड औरंगाबादकर, श्री. प्रतीक जरीपटके, श्री. नडगम आणि जर्मनीचे साधक श्री. एरिक (Erich) आदी उपस्‍थित होते. त्‍यांना सनातन आश्रमाच्‍या वतीने भेटवस्‍तू देऊन त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला.