पत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरण
नाशिक – महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वाधिक पत्रकारांचे हाल झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्पाविषयी बोलावे आणि त्यानंतर पत्रकाराची हत्या व्हावी, याचा काहीही संबंध नाही. भाजप सरकारच्या काळात दिवसाढवळ्या कुणी कायदा-सुव्यवस्था मोडत असेल, तर त्याला शिक्षा होणारच आहे, अशी स्पष्ट चेतावणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ११ फेब्रुवारी या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. येथील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते पुढे म्हणाले की, येणार्या विधानसभा निवडणुकीत ‘महाविकास आघाडी’ रहाते कि नाही ? तसेच निवडणूक लढवण्याचा तिन्ही पक्षांचा वेगवेगळा निर्णय आहे. त्यामुळे आम्ही सध्या त्यांची केवळ गंमत पहात आहे. राज्यात लवकरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची अवस्था शिवसेनेसारखी होईल. त्याचा प्रारंभ काँग्रेसमध्ये २ गट पडून झाला आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांविरोधात एक गट मोठ्या प्रमाणात सक्रीय झाला आहे. त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसला कंटाळले आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचे तीन तेरा वाजले असून कोण केव्हा बाहेर पडेल ? हे सांगता येत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी परतत असल्याविषयी टीका करतांना महाजन म्हणाले की, अनिल देशमुख यांचे स्वागत होत असेल, तर यात नवीन काही नाही. या आधीही असे झाले आहे. जेवढा मोठा गुन्हेगार तेवढे मोठे स्वागत !