बुलढाणा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न !

वेषांतर करून अंगावर ओतून घेतले पेट्रोल; ४ दिवसांपासून होते भूमीगत !

बुलढाणा – गेल्या ४ दिवसांपासून भूमीगत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी ११ फेब्रुवारी या दिवशी अंगावर पेट्रोल ओतून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पीकविमा, अतीवृष्टीचे रखडलेले साहाय्य आणि कापूस दरवाढ यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक झालेले आहेत. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे शेतकर्‍यांच्या विरोधातील सरकार आहे. सरकारने कापूस आणि सोयाबीन या पिकांना भाव दिला नाही. यासमवेत पीकविमा आणि हानीभरपाई मिळाली नाही. सरकारला जर शेतकर्‍यांना जिवंत ठेवायचे नसेल, तर शेतकर्‍यांना गोळ्या झाडून मारून टाकावे, अशी प्रतिक्रिया या वेळी तुपकर यांनी व्यक्त केली.

गेल्या ४ दिवसांपासून तुपकर हे भूमीगत होते. पोलिसांकडून शोधाशोध चालू होती. तुपकर यांनी कापूस, सोयाबीन आणि पीक विमा या प्रश्नांच्या संदर्भात सरकारला १० फेब्रुवारीची समयमर्यादा दिली होती. ती संपल्यानंतर तुपकर यांनी शेतकर्‍यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा मुंबई येथील पीक विमा आस्थापनाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याची चेतावणी दिली होती.