मुंबईतील मुक्तांगण शाळेचे कुकृत्य
मुंबई, ११ फेब्रुवारी (वार्ता.) – परीक्षेचा तणाव दूर करण्यासाठी परळ येथील मुक्तांगण शाळेच्या विद्यार्थ्यांना चक्क अश्लीलतेमुळे वादग्रस्त ठरलेला ‘पठाण’ चित्रपट दाखवला. ७ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ‘स्टेर्लिंग सिनेप्लेक्स’ या चित्रपटगृहात दुपारी दीड ते पावणेचार या वेळेतील ‘शो’ विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकावर दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने विद्यार्थ्यांसमवेत असलेल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना चित्रपट दाखवण्यामागील प्रयोजनाविषयी आणि ‘कॅमेर्यासमोर बाईट’ देण्याविषयी विचारले असता मुलाखत देण्यास त्यांनी नकार दिला.
या वेळी एका शिक्षकांनी ‘विद्यार्थ्यांचा परीक्षेचा तणाव दूर व्हावा, यासाठी त्यांना पठाण चित्रपट दाखवण्यात आला’, असे सांगितले. या वेळी विद्यार्थ्यांशी बोलतांना एका विद्यार्थ्याने चित्रपटाचे पैसे शाळेकडून भरण्यात आल्याचे सांगितले. शाळेतील वेगवेगळ्या वर्गांतील विद्यार्थ्यांना चित्रपट दाखवण्यात आला. विशेष म्हणजे परीक्षा जवळ आली असतांना इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखवण्यात आला.
१. विद्यार्थ्यांना सामाजिक जीवनात उपयोगी होईल, तसेच व्यक्तीगत विकासासाठी साहाय्य होईल, अशा राष्ट्रपुरुष, क्रांतीकारक यांच्याविषयी, तसेच सामाजिक भान निर्माण करणारे चित्रपट विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून दाखवता येतात. त्यासाठी शासन स्वत: निधीची व्यवस्थाही करते; मात्र अश्लीलतेमुळे वादग्रस्त ठरलेला, तसेच भारतीय सैनिकाला भारताविरोधी दाखवलेला ‘पठाण’ चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवण्यामागे नेमके कोणते प्रयोजन आहे ? याविषयी शिक्षकांना सांगता आले नाही.
२. मुक्तांगण ही खासगी ट्रस्टची शाळा असली, तरी या शाळेला सरकारकडून अनुदान, तसेच विविध सुविधाही प्राप्त होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बालवयात चांगले संस्कार होणारे चित्रपट दाखवण्याऐवजी मुक्तांगण शाळेकडून ‘पठाण’ चित्रपट का दाखवण्यात आला ? असा प्रश्न काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केला.